पुणे येथे पोलीस उपनिरीक्षकांसह पोलीस कर्मचार्‍यांवर फसवणुकीचा गुन्हा नोंद !

फसवणूक प्रकरणामध्ये सहभाग

पुणे – कोथरूड परिसरातील अलंकार पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पोलीस उपनिरीक्षक संतोष सोनवणे आणि पोलीस कर्मचारी ज्ञानेश्वर पालवे यांचा सहभाग आढळल्याने या दोघांवर गुन्हा नोंद करण्यात आल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या प्रकरणी सहदुय्यम निबंधक अमृता योगेश बनकर यांनी तक्रार प्रविष्ट (दाखल) केली होती.

मौजे वडगाव बुद्रूक येथील एका साडेचार गुंठे जागेवर विनाअनुमती बांधकाम करण्यात आले. या ठिकाणी ‘हुशारे कॉम्प्लेक्स’ या नावाने इमारत उभी केली आहे. या इमारतीतील सदनिकांच्या खरेदी-विक्री संदर्भातील दस्त नोंदवण्यात आले होते. या व्यवहारामध्ये सादर करण्यात आलेली कागदपत्रे बनावट असल्याची तक्रार करण्यात आली होती. ‘हुशारे कॉम्प्लेक्स’ उभारण्यात उपनिरीक्षक सोनवणे यांचा भाचा प्रसाद मोरे आणि मेव्हणा प्रकाश आव्हाड यांचा सहभाग होता. या इमारतीतील बनावट कागदपत्रांद्वारे सदनिकांची खरेदी-विक्री केल्याप्रकरणी यापूर्वीच प्रसाद मोरे आणि प्रकाश आव्हाड यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका 

असे पोलीस असतील तर जनतेने कुणावर विश्वास ठेवायचा ? गुन्ह्यामध्ये पोलिसांचा सहभाग असेल, तर त्यांना अधिक कठोर शिक्षा करायला हवी, तरच पोलीस पुन्हा गुन्हे करणार नाहीत !