Gangster Lawrence Bishnoi : कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याने कारागृहातून पाकिस्तानच्या कुख्यात गुंडाला केला व्हिडिओ कॉल !

बकरी ईदच्या दिल्या शुभेच्छा !

जालंधर (पंजाब) – कारागृहात असणारा कुख्यात गुंड लॉरेन्स बिष्णोई याने कारागृहातूनच पाकिस्तानचा कुख्यात गुंड शहजाद भट्टी याच्याशी व्हिडिओ कॉल करून संपर्क साधल्याचा एका व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. हा व्हिडिओ १६ जूनचा असल्याचे सांगितले जात आहे. लॉरेन्स सध्या गुजरातमधील साबरमती कारागृहात आहे. या व्हिडिओविषयी साबरमती मध्यवर्ती कारागृहाचे पोलीस उपअधीक्षक परेश सोलंकी म्हणाले की, आम्हाला या व्हिडिओ कॉलविषयी माहिती नाही. आम्ही त्याची चौकशी करू.

या व्हिडिओ कॉलमध्ये लॉरेन्स याने भट्टी याला बकरी ईदच्या शुभेच्छा दिल्या. यावर भट्टी म्हणाला, ‘आज नाही. उद्या पाकिस्तानमध्ये ईद आहे.’ यावर लॉरेन्स म्हणाला की, मी उद्या फोन करून शुभेच्छा देईन.

‘सिग्नल अ‍ॅप’द्वारे केला कॉल !

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा व्हिडिओ कॉल ‘सिग्नल अ‍ॅप’द्वारे करण्यात आला. यामुळे कॉल कुठून केला गेला ?, हे शोधणे कठीण जाते. कारागृहातूनच लॉरेन्स या अ‍ॅपच्या माध्यमातून त्याची संपूर्ण टोळी चालवत असल्याचाही सुरक्षायंत्रणांना संशय आहे.

संपादकीय भूमिका

  • हे कारागृह प्रशासनाला लज्जास्पद ! भारतातील कारागृहात गुंडांकडे भ्रमणभाष संच पोचतात, हे आता नवीन राहिलेले नाही. भारतातील कारागृह सामान्य आरोपींसाठी नरक ठरतात, तर पैसेवाल्यांसाठी पंचतारांकित ठरतात, हे आतापर्यंतच्या सर्वपक्षीय सरकारांनी लज्जास्पद !
  • भारताच्या कारागृहातील गुंड पाकिस्तानच्या गुंडाला भ्रमणभाष करू शकत असेल, तर कारागृहातील जिहादी आतंकवादी त्यांच्या प्रमुखांना अशा प्रकारे संपर्क करू शकत असतील, हेच यातून लक्षात येते !