वडाळा (मुंबई) येथे १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबिर पार पडले !

हिंदु जनजागृती समितीचा उपक्रम !

शिबिरात सहभागी युवक-युवती

मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने वडाळा येथील सहकार नगर मैदान येथे युवक-युवतींसाठी १० दिवसांचे शौर्य प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. २ ते ११ जून या कालावधीत झालेल्या शिबिरात शारीरिक प्रशिक्षणासह मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी १५ ते ४० वयोगटातील शिबिरार्थी सहभागी झाले होते. या शिबिरात लाठी-काठी, दंडसाखळी, प्रतिकाराचे प्रशिक्षण देण्यात आले.

समितीचे मुंबई जिल्हा समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी ‘व्यक्तीमत्त्व विकासासाठी जीवनातील साधनेचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन केले. त्यांनी समितीच्या कार्याची ओळख करून दिली. या वेळी श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती दुर्गराज रायगडचे अध्यक्ष श्री. सुनील पवार हे उपस्थित होते. ‘छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्यांसमोर ठेवून सर्वांनी राष्ट्र आणि धर्मासाठी मावळ्यांप्रमाणे कार्य करण्याची आवश्यकता आहे’, असे आवाहन श्री. पवार यांनी केले. श्री. पवार यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रशस्तीपत्र देण्यात आले. शिबिराच्या ठिकाणी राष्ट्रपुरुष आणि क्रांतीकारक यांच्या शौर्याची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते.

शिबिरार्थींचे अभिप्राय

१. कु. अनिरुद्ध शिरोडकर – प्रशिक्षणामुळे प्रसंगाला सामोरे जाण्याचा आत्मविश्वास निर्माण झाला.

२. कु. कविता चाळके – मी मुसलमानबहुल भागात रहाते. तेथे काही प्रसंग घडल्यास शिबिरात सांगितलेल्या युक्त्या वापरून प्रतिकार करू शकते.

३. कु. विघ्नेश सप्रे – हिंदु जनजागृती समिती उत्तम कार्य करत आहे. आपण याविषयी समाजात जागृती करून आपले धर्मग्रंथ, राष्ट्र-धर्म यांचे रक्षण केले पाहिजे.

वैशिष्ट्यपूर्ण :  या शिबिरात काही पालकही सहभागी झाले होते. काही जण मुलांसमवेत आले होते. त्यांनी समितीच्या सर्वच उपक्रमांचे कौतुक केले. ‘मुलांनी राष्ट्र-धर्माच्या कार्यात सहभागी व्हावे’, असे वाटत असल्याचे त्यांनी सांगितले.