लोकसभेतील ४६ टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी गुन्ह्यांची नोंद !

१७० खासदरांविरुद्ध नोंद आहेत बलात्कार आणि हत्या यांसारखे गंभीर गुन्हे !

प्रतिकात्मक छायाचित्र

नवी देहली – १८ व्या लोकसभेतील ५४३ खासदारांपैकी २५१ अर्थात् ४६ टक्के खासदारांविरुद्ध फौजदारी गुन्ह्यांची नोंद आहे, अशी माहिती ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ या संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अहवालात दिली आहे. आजवरच्या इतिहासात ही संख्या सर्वाधिक आहे.

या अहवालात पुढे म्हटले आहे की,

१. २५१ खासदारांपैकी १७० जणांविरुद्ध बलात्कार आणि हत्या यांसारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

२. २७ खासदारांना वेगवेगळ्या न्यायालयांनी दोषी ठरवले आहे.

३. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या तिसर्‍या मंत्रीमंडळातील २८ मंत्र्यांविरुद्ध फौजदारी स्वरूपाचे गुन्हे नोंद असून त्यांतील १९ जणांविरुद्ध हत्येचा प्रयत्न, अपहरण, महिलांच्या संदर्भातील गुन्हे आदी गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे.

४. केंद्रीय मंत्रीमंडळातील ८० टक्के केंद्रीय मंत्री हे पदवीधारक आहेत. ११ मंत्र्यांनी केवळ इयत्ता १२वीपर्यंत शिक्षण घेतले आहे.

५. केंद्रीय मंत्रीमंडळातील ९८ टक्क्यांहून अधिक मंत्र्यांकडे कोट्यवधी रुपयांची मालमत्ता आहे.

संपादकीय भूमिका

  • असे खासदार कधी जनतेला सुरक्षित आणि न्यायाचे राज्य देतील का ? हा लोकशाहीचा दारूण पराभव नव्हे का ?