ओटावा (कॅनडा) – भारताच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येचे उदात्तीकरण करण्याचा प्रयत्न कॅनडात नुकताच करण्यात आला. याविषयीचा एक व्हिडिओ समोर आल्यानंतर भारताने कठोर भूमिका घेत इंदिरा गांधी यांच्या हत्येचा उत्सव साजरा करणार्यांवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. ‘ऑपरेशन ब्लूस्टार’ला ४० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने कॅनडातील ब्रॅम्प्टन शहरात खलिस्तान समर्थकांनी एक चित्ररथ फेरी काढली होती. यामध्ये इंदिरा गांधी यांच्या पुतळ्याला त्यांच्या शीख अंगरक्षकांनी गोळ्या घालतांना दाखवले आहे. कॅनडाचे भारतातील उच्चायुक्त कॅमेरून मॅके यांनीही ‘हा प्रकार पूर्णपणे अस्वीकार्य असून हिंसाचाराला प्रोत्साहन देणे, आम्ही कधीही मान्य करणार नाही’, असे सांगितले.
परराष्ट्रमंत्री जयशंकर यांच्याकडून अप्रसन्नता व्यक्त !
परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी या चित्ररथफेरीला अनुमती दिल्याविषयी अप्रसन्नता व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘हे शीख फुटीरतावाद्यांच्या हिंसाचाराचे समर्थन करण्यासारखे आहे. हे कॅनडासाठी चांगले नाही आणि भारतासमवेतच्या संबंधांसाठीही चांगले नाही.’’