ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मूलाधार ! – श्रीमती इंदुताई काटदरे, पुनरुत्थान विद्यापीठ, कर्णावती

लातूर येथे दोन दिवसीय अखिल भारतीय विद्वत् परिषदेचा प्रारंभ !

डावीकडून श्री. अनिल भालेराव, श्री. भैय्याजी जोशी, श्री. बसवराज पाटील, मार्गदर्शन करतांना श्रीमती इंदुताई काटदरे आणि परिषदेचे संयोजक श्री. संदीप रांकावत

लातूर – आज भारत देशात पाश्‍चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण केले जात असल्यामुळे येथील ज्ञान प्रदूषित झाले आहे. वर्तमान परिस्थितीत भारताला ज्ञाननिष्ठ देश बनवण्यासाठी शास्त्रांचे मूळ सिद्धांत सर्वांसमोर आणले पाहिजेत; कारण ज्ञान हाच भारतीय जीवनाचा मूलाधार आहे, असे मार्गदर्शन कर्णावती येथील पुनरुत्थान विद्यापिठाच्या कुलपती श्रीमती इंदुताई काटदरे यांनी केले. पुनरुत्थान विद्यापिठाच्या वतीने हरंगुळ येथील जनकल्याण विद्यालयात दोन दिवसीय अखिल भारतीय विद्वत् परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. त्या वेळी त्या बोलत होत्या.

या वेळी व्यासपिठावर श्री. बसवराज पाटील, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या केंद्रीय कार्यकारिणीचे सदस्य श्री. भैय्याजी जोशी, देवगिरी प्रांताचे प्रांत संघचालक श्री. अनिल भालेराव आणि परिषदेचे संयोजक श्री. संदीप रांकावत उपस्थित होते. या परिषदेसाठी देशभरातून विविध विचारवंच, संत, मान्यवर आले असून या परिषदेसाठी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे उपस्थित आहेत. दोन दिवस चालणार्‍या या परिषदेत विविध विषयांवर गटचर्चा आणि मान्यवरांचे मार्गदर्शन असणार आहे.

अखिल भारतीय विद्वत् परिषदेच्या प्रसंगी चालू असलेल्या गटचर्चेत सहभागी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे, तसेच अन्य मान्यवर

श्रीमती इंदुताई काटदरे पुढे म्हणाल्या, ‘‘पाश्‍चात्त्यांनी भारतीय ज्ञानावर आक्रमण केले आहे. मंदिरांसमवेत ग्रंथही नष्ट करण्यात आले. ज्ञान क्षेत्रावर आक्रमण झाल्याने आज देशातील विद्यापिठात जे शिक्षण दिले जाते, ते अभारतीय आहे. अशा अभारतीय शिक्षणामुळे आपली दृष्टी अर्थकेंद्री आणि कामकेंद्री बनली आहे.’’

भारतातील प्रत्येक शास्त्र दुसर्‍याला पूरक ! – बसवराज पाटील

या प्रसंगी श्री. बसवराव पाटील म्हणाले, ‘‘अन्य राष्ट्रांमध्ये त्यांच्या भाषांमध्येच शिक्षण दिले जाते. त्यामुळे भारतातही शिक्षण हे मातृभाषेतच दिले गेले पाहिजे. असे झाले, तरच ते मुलांना योग्य प्रकारे समजू शकेल. आज लाखोंच्या संख्येने अभियंता तरुण केवळ १० सहस्र रुपये वेतनावर, तर ‘एम्.बी.ए.’ आणि तत्सम उच्चशिक्षण घेतलेले युवक केवळ ५ सहस्र रुपये वेतन घेऊन चाकरी करत आहेत. भौतिक शिक्षणात अशी कोणती न्यूनता आहे, ती शोधून त्यावर उपाययोजना काढली पाहिजे. सध्याच्या विद्यार्थ्यांना वेद, पुराणे यांमधील अर्थ उलगडत नसेल, तर किमान मुलांना पंचतंत्र तरी शिकवले गेले पाहिजे. मी पंचतंत्राची १२ सहस्र पुस्तके घेऊन ती वाटली आहेत. यातून त्यांच्यावर निश्‍चित संस्कार होण्यास साहाय्य होईल. मी एके ठिकाणी एका कार्यक्रमात गेलो होतो, त्या ठिकाणी माझ्या लक्षात आले की, आपल्याकडे ८०० हून अधिक शास्त्रे आहेत. प्रत्येक शास्त्र दुसर्‍याला पूरक आहे. आपण जिथे आहोत, तिथे त्याचा अभ्यास करून, परिपूर्ण कार्य करून देवापर्यंत पोचू शकतो.’’

अखिल भारतीय विद्वत् परिषदेसाठी उपस्थित मान्यवर

क्षणचित्रे

१. कार्यक्रमाचा प्रारंभ दीपप्रज्वलन करून आणि सरस्वतीदेवीच्या प्रतिमेच्या पूजनाने करण्यात आला.

२. येथील प्रत्येक गोष्ट आणि कृती ही भारतीय संस्कृतीशी निगडित अशीच करण्यात येत होती.