६३ टक्के आध्यात्मिक पातळीची महर्लाेकातून पृथ्वीवर जन्माला आलेली यवतमाळ येथील चि. ओजस्वी सोळंके (वय ४ वर्षे) !

उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. ओजस्वी प्रशांत सोळंके ही या पिढीतील एक आहे !

‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’  

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले


पालकांनो, हे लक्षात घ्या !

‘तुमच्या मुलात अशा तर्‍हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’

– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले

यवतमाळ येथील चि. ओजस्वी प्रशांत सोळंके हिची तिच्या आई-वडिलांच्या लक्षात आलेली गुणवैशिष्ट्ये येथे दिली आहेत.

चि. ओजस्वी सोळंके

१. जन्मापूर्वी

अ.  ‘मला गर्भारपणात कोणताही त्रास झाला नाही. मला प्रसन्न वाटत असे.

आ. माझा नामजप चांगला होत असे. मला गर्भातून नामजपाचा ध्वनी स्पष्ट ऐकू येत असे.

२. जन्मानंतर

२ अ. जन्म ते १ वर्ष

१. एका परिचारिकेने मला विचारले, ‘तुमची ‘प्रसूती होतांना तुम्ही ‘ॐ, ॐ’ म्हणत होतात, ते काय होते ?’’ तेव्हा ‘माझ्या नकळत श्री गुरुच माझ्याकडून नामजप करून घेत होते’, याबद्दल मला कृतज्ञता वाटली.

२. बाळाला माझ्याजवळ आणल्यावर मला सूक्ष्मातून दिसले, ‘३ देवी बाळाच्या भोवती बसून बोलत आहेत. त्या देवी म्हणजे पांढरी साडी नेसलेली श्री सरस्वतीदेवी, हिरवी साडी नेसलेली

श्री महालक्ष्मीदेवी आणि लाल साडी नेसलेली श्री भवानीदेवी होती.’ त्यांच्या दर्शनाने माझे मन तृप्त झाले. तेव्हा मला बाळाचे केवळ पाय दिसत होते.

३. ओजस्वीला अन्नपदार्थ भरवतांना आमचा (माझा आणि माझ्या यजमानांचा) नामजप चालू होत असे.

४. तिचा चेहर्‍यावर अनेक दैवी कण आढळत असत.

५. तिला औषध देतांना ‘परम पूज्यांनी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी) तुझ्यासाठी आश्रमातील प्रसाद दिला आहे’, असे म्हटल्यावर ती लगेच घेत असे.’

– सौ. केतकी सोळंके (चि. ओजस्वीची आई)

२ आ. वय १ ते २ वर्षे

१. ‘ती रडत असतांना तिला परम पूज्यांच्या छायाचित्रासमोर नेल्यावर ती लगेच शांत होत असे.

२. ती खेळत असेल आणि आम्ही (माझी पत्नी आणि मी) प्रार्थना करत असलो की, ती शांत होऊन प्रार्थना करत असे.’

– श्री. प्रशांत सोळंके (चि. ओजस्वीचे वडील)

२ इ. वय २ ते ३ वर्षे

१. ‘ओजस्वी कधी कधी सकाळी एकटीच उठून नामजप करते.

२. ती दिवसभरात अनेक वेळा परम पूज्यांच्या छायाचित्राला नमस्कार करते. तेव्हा ‘ती प्रार्थना आणि कृतज्ञता व्यक्त करत आहे’, असे आम्हाला जाणवते. ती परम पूज्यांच्या छायाचित्राला नमस्कार करतांना आम्हालाही तसे करायला लावते. ती नेहमी अंघोळ झाल्यानंतर लोटांगण घालून नमस्कार करते.

३. एकदा ती झोपण्यापूर्वी नामजपादी उपाय करायला विसरली. तेव्हा तिने रात्री एकटीच उठून नामजपादी उपाय केले आणि नंतर झोपली.’

– सौ. केतकी सोळंके आणि श्री. प्रशांत सोळंके

२ ई. वय ३ ते ४ वर्षे

२ ई १. प्राणी आणि झाडे यांच्यावर प्रेम करणे

अ. ‘एकदा घराजवळच्या एका झाडावर एक खारुताई बसून जोरजोरात ओरडत होती. तेव्हा ओजस्वी म्हणाली, ‘‘तिला भूक लागली असेल.’’ तिने खारीला मानसरित्या जेवू घातले. आश्चर्य म्हणजे त्यानंतर खारुताई लगेच गप्प झाली.

आ. ओजस्वीला पारिजातकाची फुले फार आवडतात. तिला पारिजातकाची फुले सकाळी गळून पडलेली दिसत असत. तेव्हा ती म्हणाली, ‘‘झाडाखाली कापड अंथरून ठेवूया. त्या झाडात आणि फुलातही देवच आहे ना !’’

२ ई २. हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी चांगले वाटणे : ती प्रथमच पुसद येथील हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या वेळी आमच्या समवेत आली होती. तेव्हा तिला चांगले वाटत होते. ती म्हणाली, ‘‘आई, मला पुष्कळ थंड वाटत आहे.’’

२ ई ३. चुकांविषयी संवेदनशील : एकदा तिला राग आला आणि तिने मला मारले. तेव्हा मी तिला सांगितले, ‘‘माझी क्षमा माग.’’ ती गुरुदेवांच्या छायाचित्राजवळ गेली आणि कान पकडून म्हणाली, ‘‘क्षमा करा.’’

२ ई ४. निसर्गातील घटकांप्रती कृतज्ञताभाव : एकदा तिला दगडाची ठेच लागली. तिची समजूत घालण्यासाठी मी म्हणालो, ‘‘मार त्या दगडाला.’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘त्या दगडाने मुद्दाम मारले नाही. त्या दगडातही देव आहे.’’ ती दगडाला म्हणाली, ‘‘आभारी आहे, कृतज्ञ आहे.’’ नंतर काही वेळाने दगडाकडे पहात ती म्हणाली, ‘‘तुमच्यापासून ही सगळी माती होते. त्यात आम्ही बी टाकतो. नंतर त्याचा तांदूळ होतो. आम्ही स्वयंपाक करून जेवण करतो; म्हणून मी तुझ्याप्रती कृतज्ञ आहे.’’

२ ई ५. देवाप्रती भाव

अ. ‘ओजस्वी काही दिवस दुपारी थोडेच जेवत असे. त्याविषयी मी तिला विचारल्यावर ती म्हणाली, ‘‘मी जेवत नाही; कारण श्री दत्तप्रभु माझ्याशी बोलत नाहीत; म्हणून माझे प्रायश्चित्त आहे.’’

आ. एकदा ती खेळतांना म्हणाली, ‘‘तो बघ कृष्ण.’’ मी शोधल्यासारखे केले आणि तिला ‘‘कुठे आहे ग’’, असे विचारले. तेव्हा तिने हात जोडून डोके टेकवले आणि म्हणाली, ‘‘ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे.’’

२ ई ६. गुरुदेवांच्या प्रती भाव

अ. एकदा मी तिला म्हणालो, ‘‘गुरुदेवांची आमच्यावर कृपा आहे. तुम्ही दोघे (ओजस्वी आणि मुलगा शौर्य, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ९ वर्षे) आमच्या घरी जन्माला आला आहात.’’ तेव्हा ती लगेच गुरुदेवांच्या छायाचित्रासमोर जाऊन म्हणाली, ‘गुरुदेव, तुमची कृपा आहे. कृतज्ञता, कृतज्ञता, कृतज्ञता !’’ त्यानंतर ती गुरुदेवांची आरती करू लागली.

आ. एकदा ती एकटीच २० ते २५ मिनिटे खेळत होती. आम्ही तिला विचारले, ‘‘कुणाशी खेळत आहेस ?’’ तेव्हा ती म्हणाली, ‘‘प.पू. डॉक्टर माझ्याशी (सूक्ष्मातून) खेळत आहेत.’’

इ. तिला अभ्यास करायला आवडतो. एकदा ती शाळेतून आल्यावर मला म्हणाली, ‘‘आज परम पूज्य माझ्याजवळ बसले होते.’’

३. ओजस्वीमधील स्वभावदोष

हट्टीपणा आणि राग येणे.’

– श्री. प्रशांत सोळंके

(लेखातील सूत्रांचा दिनांक : १०.५.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • दैवी कण : सात्त्विक व्यक्ती, स्थान आदी ठिकाणी सोनेरी, रूपेरी आदी अनेक रंगांत दिसणार्‍या या कणांचे ‘भाभा अ‍ॅटोमिक रिसर्च सेंटर’मध्ये पृथक्करण करण्यात आले. आय.आय.टी. मुंबई येथे केलेल्या चाचणीनुसार या कणांमध्ये कार्बन, नायट्रोजन आणि ऑक्सिजन  हे  घटक  असल्याचे  सिद्ध  झाले.  या  घटकांच्या  मूलद्रव्यांच्या  प्रमाणावरून शोधलेले  त्यांचे  ‘फॉर्म्युले’  सध्या  अस्तित्वात  असलेल्या  कोणत्याही  कणांच्या ‘फॉर्म्युल्या’शी मिळतीजुळती नाहीत. त्यामुळे हे कण नाविन्यपूर्ण आहेत, हे लक्षात येते. साधक या कणांना ‘दैवी कण’ असे संबोधतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक
  • यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे  (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.