पेढे (चिपळूण) येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण पर्यटन परिषद

  • शाश्वत विकासासाठी विचारमंथन

  • कार्यकर्त्यांचाही होणार सन्मान

पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र

चिपळूण – कोकणात विशेषत्वाने पर्यावरण पर्यटन क्षेत्रात ठोस काम करणार्‍या चिपळूणस्थित व्यक्ती किंवा संस्था यांच्या वतीने २ जूनला सकाळी ९:३० ते दुपारी २:३० या वेळेत तालुक्यातील पेढे येथील श्री परशुराम निसर्ग पर्यटन केंद्र येथे कोकण पर्यावरण  पर्यटन परिषद आणि कार्यकर्ता सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे.

या परिषदेत कोकण पर्यावरण पर्यटन परिषद आणि विलास महाडिक सेवापूर्ती सन्मान सोहळा आमदार शेखर निकम यांच्या हस्ते पार पडणार आहे. सकाळी १० वाजता कार्यकर्ता सन्मान सोहळा, ११ वाजता पर्यावरण पर्यटन परिषद, दुपारी १ वाजता खुली चर्चा समारोप आणि सहभोजन असे कार्यक्रम होणार आहेत. या परिषदेसाठी महाराष्ट्र शासनाचा वनश्री पुरस्कारप्राप्त पुणे येथील महेंद्र घागरे, कोकण भूमी कृषि पर्यटन सहकारी पर्यटन संस्थेच्या सचिव डॉ. मीनल ओक, रत्नागिरी पर्यटन सहकारी सेवा संस्थेचे अध्यक्ष राज भाटलेकर परशुराम येथील श्री भार्गवराम संस्थानचे विश्वस्त डॉ. प्रशांत पटवर्धन, निसर्ग व सामाजिक पर्यावरण प्रदूषण मंडळाचे सचिव धीरज वाटेकर, शिरवली येथील ‘नंदूचे जंगल’चे संचालक नंदू तांबे उपस्थित रहाणार आहेत.

तालुक्यासह कोकणचा शाश्वत विकास हा पर्यावरणस्नेही सर्वंकष पर्यटन उद्योग, व्यापार, उदीम, व्यवसाय यांच्या माध्यमातून प्राधान्याने साधला जाणार आहे. त्यादृष्टीने अधिक प्रमाणात या क्षेत्रात चळवळीला गतिमानता यावी, या संबंधित क्षेत्रात अनेक व्यक्ती, संस्था, व्यावसायिकरित्या कृती प्रवण व्हाव्यात, या उद्देशाने ही परिषद आयोजित करण्यात आली आहे.

सर्वश्री प्रकाश उपाख्य बापू काणे, कैसर दलवाई, धीरज वाटेकर, समीर कोवळे हे पर्यटन क्षेत्रांमध्ये गेली अनेक वर्षे वावरत आहेत. त्यांच्याच पुढाकाराने ही परिषद होत आहे. या संबंधित क्षेत्रात सातत्यपूर्ण संयमाने ठोस योगदान देणार्‍या कार्यकर्त्यांचा सत्कार या परिषदेनिमित्त होणार आहे.