Lahore Declaration : भारतासमवेत केलेला लाहोर करार मोडणे, ही आमची चूक !  – पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी कारगिल युद्धावरून दिली स्वीकृती !

पाकिस्तानचे तत्कालीन पंतप्रधान नवाझ शरीफ व भारताचे तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी (संग्रहित छायाचित्र)

लाहोर (पाकिस्तान) – २८ मे १९९८ या दिवशी पाकिस्तानने ५ आण्विक चाचण्या घेतल्या. त्यानंतर भारताचे तत्कालीन पंतप्रधान वाजपेयी साहेब येथे आले आणि आमच्यासमवेत लाहोर करार केला; मात्र आम्ही हा करार मोडला. ही आमची चूक होती, अशी स्वीकृती पाकिस्तानचे माजी पंतप्रधान आणि आता सत्ताधारी ‘पाकिस्तान मुस्लिम लीग-नवाज’ पक्षाचे अध्यक्ष नवाझ शरीफ यांनी येथे दिली. वर्ष १९९९ मध्ये कारगिल युद्ध करून पाकने हा करार मोडला होता. त्या वेळी सैन्यदलप्रमुख परवेझ मुशर्रफ यांनी कारगिलवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न केला होता. त्या वेळी नवाझ शरीफ पंतप्रधान होते.

लाहोर करार काय होता ?

शरीफ आणि वाजपेयी यांनी लाहोरमध्ये ऐतिहासिक शिखर परिषदेनंतर २१ फेब्रुवारी १९९९ या दिवशी लाहोर करारावर स्वाक्षर्‍या केल्या होत्या. यामध्ये दोन्ही देशांनी शांतता आणि स्थैर्य यांचे सूत्र मांडत भविष्यात सशक्त नात्याला बळ दिले होते. या करारतील अटींनुसार अणू शस्त्रास्त्रांच्या विकासासाठी किंवा त्यांचा वापर टाळण्यासाठी दोन्ही देशांमध्ये परस्पर सामंजस्य झाले. या करारामुळे दोन्ही देशांमध्ये आण्विक शर्यत, तसेच पारंपरिक आणि अपारंपरिक संघर्ष टाळण्यासाठी दोन्ही राष्ट्रांच्या नेतृत्वावर अतिरिक्त दायित्व आले. तथापि या करारावर स्वाक्षरी केल्याच्या काही महिन्यानंतर पाकिस्तानने जम्मू-काश्मीरात केलेल्या घुसखोरीमुळे कारगिल युद्ध झाले.

संपादकीय भूमिका

२५ वर्षांनंतर स्वीकृती देऊन काय उपयोग ? हा करार मोडण्यास उत्तरदायी असणारे परवेझ मुशर्रफ यांचा मृत्यूही झाला आहे. भारतासमवेत खरेच चांगले संबंध निर्माण करायचे असतील, तर शरीफ यांनी पाककडून भारतात होणार्‍या आतंकवादी कारवाया थांबवणे, भारताला हव्या असणार्‍या आतंकवाद्यांना स्वाधीन करणे, पाकव्याप्त काश्मीर भारताला परत देणे, पाकमधील हिंदूंचा वंशसंहार थांबवून त्यांचे रक्षण करणे आदी गोष्ट केल्या पाहिजेत !