Savarkar : सावरकर यांचा त्याग, शौर्य आणि संकल्पशक्ती यांच्या कथा आजही प्रेरणादायी !

स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या १४१ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी केले अभिवादन !

नवी देहली – स्वातंत्र्यवीर सावरकर यांचा त्याग, शौर्य आणि संकल्पशक्ती यांच्या कथा आजही आपल्याला प्रेरणा देतात, असे वक्तव्य पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वर पोस्ट करून केले. क्रांतीकारकांचे मुकुटमणी असलेले स्वातंत्र्यवीर सावरकर यांची २८ मे या दिवशी १४१ वी जयंती देशभरात उत्साहात साजरी करण्यात आली. या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधानांनी एक्सवर सावरकरांना अभिवादन करत एक व्हिडिओही पोस्ट केला आहे. ‘मातृभूमीच्या सेवेत आपले जीवन समर्पित करणारे महान स्वातंत्र्यसेनानी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन करतो !’, असेही पंतप्रधानांनी व्हिडिओला ‘कॅप्शन’ देत लिहिले आहे.

सावरकरांनी एक राष्ट्र आणि एक संस्कृती ही भावना निर्माण केली ! – गृहमंत्री शहा

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी त्यांच्या ज्वलंत विचारांनी देशातील तरुणांमध्ये देशभक्तीची भावना जागवली. तसेच एक राष्ट्र आणि एक संस्कृती ही भावना निर्माण केली. त्यांनी राष्ट्रवादाचा मंत्र आत्मसात केला आणि लांगूलचालनाच्या धोरणांना जोरदार विरोध केला. आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण राष्ट्रासाठी समर्पित करणार्‍या सावरकरांनी अस्पृश्यतेसारख्या चुकीच्या प्रथेविरोधात जनजागृती मोहीम चालू केली, अशी पोस्ट गृहमंत्री अमित शहा यांनी केली.