UK General Elections : सत्ताधारी पक्षातील ७८ खासदारांनी राजकारण सोडले !

  • ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणूक

  • एकूण १२२ नेत्यांचा निवडणूक लढवण्यास नकार !

ब्रिटनचे पंतप्रधान ऋषी सुनक

लंडन (इंग्लंड) – ब्रिटनमधील सार्वत्रिक निवडणुकीच्या घोषणेनंतर पंतप्रधान ऋषी सुनक यांच्यासमोर एक नवी समस्या निर्माण झाली आहे. सत्ताधारी ‘कंझर्व्हेटिव्ह’ (पुराणमतवादी) पक्षात खासदारांनी त्यागपत्र देण्यास आरंभ केला आहे. या पक्षाचे वरिष्ठ नेते मायकल गोव्ह आणि आंद्रे लीडसम यांचाही यात समावेश आहे. यामुळे सुनक यांच्या पक्षातील राजकारणातून निवृत्त झालेल्या एकूण खासदारांची संख्या ७८ झाली आहे. त्यागपत्र दिलेल्या एकूण ब्रिटीश खासदारांची संख्या १२२ झाली आहे. ४ जुलै या दिवशी निवडणूक होणार आहे.

वर्ष २०१० च्या सार्वत्रिक निवडणुकीनंतर एवढ्या मोठ्या संख्येने खासदारांची निवडणूक लढवण्यास नकार दिल्याची ही सर्वांत मोठी संख्या आहे. ब्रिटीश संसदेच्या खालच्या संसदेत एकूण ६५० खासदार आहेत.

सार्वत्रिक निवडणुकीपूर्वी त्यागपत्र देण्यामागे ही आहेत कारणे !

१. सर्वांत महत्त्वाचे कारण म्हणजे देशातील पुराणमतवादी पक्षाची दयनीय स्थिती. पक्षाच्या अनेक खासदारांना निश्‍चिती आहे की, पुढील निवडणुकीत त्यांचा पराभवच होईल.

२. अनेक खासदारांचे वाढते वय हे एक महत्त्वाचे कारण मानले जात आहे. असे असले, तरी काही खासदार असे आहेत, ज्यांचे वय ३० वर्षांपेक्षा अल्प आहे, पण तरीही त्यांना निवडणूक लढवायची नाही.

३. काही खासदारांनी राजकारण सोडून अन्य व्यवसायात स्वत:ला गुंतवायचे ठरवले आहे.

४. काही खासदारांनी तणावाच्या राजकारणापासून दूर रहाण्यासाठी पुढील निवडणुका न लढवण्याचा निर्णय घेतला.