‘जागतिक बाल लठ्ठपणा दिना’निमित्त चर्चासत्र
मुंबई – लहान मुलांमधील वाढत्या लठ्ठपणाला ‘फास्टफूड’ कारणीभूत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुलांसाठी तृणधान्यापासून सुपरफूड बनवण्याचा निर्धार केला आहे. सुपरफूडच्या माध्यमातून मुलांना एक उत्तम पर्याय उपलब्ध होईल, असे मत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. ‘जागतिक बाल लठ्ठपणा दिना’निमित्त ‘जनरेशन एक्सएल् ओबेसिटी फाउंडेशन’चे संस्थापक डॉ. संजय बोरुडे यांनी विशेष चर्चासत्राचे आयोजन केले होते. याप्रसंगी राज ठाकरे उपस्थित होते.
‘जागतिक लठ्ठपणा ॲटलस’च्या मते वर्ष २०३५ पर्यंत ५१ टक्के नागरिक लठ्ठपणाने ग्रासलेले असतील, तर ८७ टक्के आधुनिक वैद्यांना बालपणातील लठ्ठपणावर उपचारांविषयी माहिती नसल्याची गंभीर आकडेवारी समोर आली आहे. लठ्ठपणा हा प्राणघातक; परंतु टाळता येण्याजोगा आजार आहे. मुलांना संतुलित आहार देणे, प्रतिदिन व्यायाम आणि औषधोपचारासाठी प्रोत्साहन देणे आवश्यक आहे’, असे ‘जनरल एक्सएल ओबेसिटी फाउंडेशन’चे डॉ. संजय बोरुडे यांनी सांगितले.
लठ्ठपणाविषयी पालकांना शिक्षित करणे आणि जनजागृती करणे हे आधुनिक वैद्यांचे दायित्व ! – राज ठाकरे, मनसे
पालकांना त्यांच्या मुलांना निरोगी आणि गुबगुबीत ठेवायला आवडते; परंतु गुबगुबीत असणे म्हणजे लठ्ठपणा. पालकांना लठ्ठपणासारख्या आजाराविषयी शिक्षित करणे आणि जनजागृती करणे हे आधुनिक वैद्यांचे दायित्व आहे. शाळांच्या उपाहारगृहात मुले ‘जंकफूड’ खातात. हे लक्षात घेऊन शाळांमध्ये मुलांना पौष्टिक आहार कसा मिळेल ? याकडे लक्ष द्यायला हवे. घरी बनवलेले अन्न घेतल्यासच निरोगी रहाता येते.