धार्मिक भावना दुखावणार्‍या कुंकळ्ळी (गोवा) येथील श्रेया धारगळकर हिच्या विधानाचा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याकडून निषेध

धार्मिक भावना दुखावण्याचे धाडस कुणीही करू नये, यासाठी या प्रकरणी कडक कारवाई केली जाणार !

पणजी, २३ मे (वार्ता.) – मी स्वत: शिरगाव येथील श्री देवी लईराई आणि कुंकळ्ळी येथील श्री शांतादुर्गा कुंकळ्ळीकरीण यांचा भक्त आहे. श्रेया धारगळकर हिने केलेली विधाने ही भक्तांची श्रद्धा दुखावणारी आहेत.

श्री देवी लईराईच्या व्रतस्थ धोंडांविषयी श्रेया धारगळकर यांनी आक्षेपार्ह विधाने केली आहेत. त्यामुळे श्रेया धारगळकर आणि अशी विधाने करणारे यांचा मी निषेध करतो. असे प्रकार करण्याचे धाडस कुणीही करू नये, यासाठी या प्रकरणी संबंधितांवर कडक कारवाई केली जाणार आहे. या दृष्टीने पोलिसांना योग्य सूचना करण्यात आल्या आहेत. तिच्यावर होणार असलेल्या कारवाईवरून इतरांनी असले दु:साहस करू नये, हीच अपेक्षा आहे. कोणत्याही धर्मियांच्या धार्मिक भावना दुखावता येणार नाहीत, अशी चेतावणी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली आहे. देहली येथून परतल्यावर २३ मे या दिवशी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

खंडणीखोर अशासकीय संस्थांवर कारवाई होणार ! –  मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत

या प्रकरणी मुख्यमंत्री पुढे म्हणाले, ‘‘अशासकीय संस्थांच्या (एन्.जी.ओ.च्या) नावांनी खंडणी उकळणार्‍या संस्थांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल. अशा अशासकीय संस्था चालवणार्‍यांच्या विरोधात नागरिकांनी न घाबरता पोलिसात तक्रार प्रविष्ट (दाखल) केली पाहिजे. तक्रारीची नोंद घेतली जाईल. काही अशासकीय संस्था वैयक्तिक स्तरावर चालवल्या जात आहेत. या संस्था लोकांना साहाय्य करण्याच्या नावाखाली त्यांच्याकडून खंडणी वसूल करत आहेत. अशा स्वरूपाच्या अनेक तक्रारी आलेल्या आहेत. सरकार असा प्रकार खपवून घेणार नाही. अशासकीय संस्थांच्या नावाखाली विनाकारण टीका करणार्‍यांनी ‘सरकार त्यांच्यावर कारवाई करेल’ हे ध्यानात ठेवले पाहिजे. खंडणीखोर अशासकीय संस्थांना आळा घालण्यासाठी पोलीस आणि सोसायटी प्रबंधक यांच्या नियमांचा अभ्यास केला जाणार आहे.’’

श्रेया धारगळकर हिला १४ दिवस न्यायालयीन कोठडी

पणजी – श्री लईराईदेवीचे व्रतस्थ धोंड यांचा अवमान केल्याच्या प्रकरणी डिचोली पोलिसांनी २२ मे या दिवशी श्रेया धारगळकर हिला कह्यात घेतले. त्यानंतर तिला प्रथमश्रेणी न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने तिला १४ दिवस (४ जूनपर्यंत) न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.

२२ मे या दिवशी सायंकाळी संतप्त भाविकांनी श्रेया धारगळकर हिला त्वरित पोलीस ठाण्यात उपस्थित करण्याच्या मागणीवरून मोठ्या संख्येने डिचोली पोलीस ठाण्यावर धडक दिली. त्यानंतर हमरस्त्यावर बसून डिचोली-साखळी मार्ग आणि नवीन बगल रस्ता यांवरील वाहतूक रोखून धरली. उपअधीक्षक सागर एकोस्कर आणि निरीक्षक राहुल नाईक यांनी या वेळी संतप्त भाविकांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र नागरिक त्यांच्या भूमिकेवर ठाम राहिल्याने काही वेळ येथे तणावाचे वातावरण निर्माण झाले.

पोलीस उपअधीक्षक सागर एकोस्कर म्हणाले, ‘‘श्रेया धारगळकर हिला डिचोली पोलिसांनी कह्यात घेतले असून तिला आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यामुळे आता तिला डिचोली पोलीस ठाण्यात आणणे शक्य नाही.’’ या प्रकरणी तोडगा काढण्यासाठी रात्री ११.३० वाजता पोलीस अधिकारी, तसेच आमदार प्रेमेंद्र शेट आणि नागरिकांचे शिष्टमंडळ यांनी तालुक्याच्या मामलेदारांशी चर्चा केली. यानंतर आमदार प्रेमेंद्र शेट आणि पोलीस अधिकारी यांनी श्रेया धारगळकर हिला तडीपार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर जमाव शांत झाला.