विद्यार्थ्यांची जातनिहाय सूची केल्याने ‘निर्मला कॉन्व्हेंट स्कूल’वर कारवाईची मागणी !

सातारा, २१ मे (वार्ता.) – विद्यार्थ्यांची जातनिहाय सूची करून जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करणार्‍या ‘निर्मला कॉन्व्हेंट स्कूल’च्या प्रशासनावर कारवाई करा, अशी मागणी शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी केली आहे. याविषयीचे निवेदन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना देण्यात आले.

काही दिवसांमध्ये शाळा चालू होणार असून सातारा येथील निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रशासनाने प्रवेश प्रक्रिया निश्चित करण्यास प्रारंभ केला आहे. या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या जातनिहाय सूची सिद्ध केल्या जात आहेत. हिंदु-मराठा, हिंदु-ब्राह्मण, हिंदु-माळी, हिंदु-रामोशी अशा पद्धतीने सूची सिद्ध करून विद्यार्थ्यांना जातनिहाय वर्गामध्ये बसवण्याचा शाळा प्रशासनाचा डाव आहे. ही माहिती शहरातील हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्यकर्त्यांना समजली. निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रशासनाला हिंदुत्वनिष्ठ निवेदन देण्यासाठी गेले असता शाळा प्रशासनाने निवेदन घेण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे कार्यकर्त्यांनी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांना भेटून शाळेकडून होत असलेला जातीभेदाचा प्रकार सांगितला, तसेच निर्मला कॉन्व्हेंट स्कूलच्या प्रशासनावर कडक कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. या वेळी निर्मला कॉन्व्हेंट स्कूलची शिक्षणााधिकार्‍यांच्या माध्यमातून चौकशी करून त्यामध्ये कुणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी हिंदुत्वनिष्ठांना दिले.