कारचालक मुलाचे वडील आणि २ पबचालक यांच्यावर पुणे पोलिसांकडून गुन्हा नोंद !
नेमके काय घडले?
पुणे येथे प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत अग्रवाल याने त्याच्या ‘ईव्ही पोर्शे’ कारने दुचाकीला धडक दिली. त्यामध्ये माहिती तंत्रज्ञान अभियंता असलेल्या दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला होता. |
पुणे – येथील प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक विशाल अग्रवाल यांचा मुलगा वेदांत याने २ माहिती तंत्रज्ञान अभियंत्यांना स्वत:च्या गाडीखाली चिरडले; पण अवघ्या काही घंट्यांत वेदांत अग्रवाल याला जामीन मिळाला. आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. पुण्यात रात्री-अपरात्री, उशिरापर्यंत चालू असलेले बार आणि मुलाचा बेदरकारपणा आज दोघांच्या जिवावर बेतला. या घटनेनंतर प्रचंड संताप व्यक्त होत आहे. आता या प्रकरणाची कठोर चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. देवेंद्र फडणवीस यांनी पुणे पोलीस आयुक्तांना भ्रमणभाष करून आदेश दिले आहेत. या प्रकरणातील आरोपीला जामीन मिळाला असला, तरी त्याविरुद्ध अपील प्रविष्ट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या प्रकरणात आरोपीला कोणती विशेष वागणूक दिली असल्यास त्या वेळचे पोलीस ठाण्यातील सीसीटीव्ही पडताळून ते खरे असेल, तर तात्काळ संबंधितांवर निलंबनाची कारवाई करा, अशाही सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत.
पुण्यातील कल्याणीनगरमध्ये घडलेल्या अपघाताला संबंधित कारचालक मुलाच्या वडिलांना कारणीभूत ठरवले आहे. या प्रकरणी कारचालक मुलाचे वडील विशाल अग्रवाल आणि त्याला मद्य देणार्या २ पबचालकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. मुलगा अल्पवयीन असूनही त्याला कार चालवायला दिल्याबद्दल विशाल अग्रवाल यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मुलाला मद्य देणारे ‘हॉटेल काझी’चे मालक प्रल्हाद भुतडा आणि व्यवस्थापक सचिन काटकर त्याचसह ‘हॉटेल ब्लॅक’चे संदीप सांगळे आणि बार काऊंटर जयेश बोनकर यांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
आरोपीवर सज्ञान म्हणून कारवाईसाठीन्यायालयात दाद मागणार ! – पुणे पोलीस
पुणे – कोरेगाव पार्क मधील अल्पवयीन मुलाने बारमध्ये जाऊन मद्य पिऊन आलिशान कार भरधाव वेगात चालवून २ जणांचा अपघाती मृत्यू करणे, हे प्रकरण गंभीर आहे. पोलिसांनी याविषयी गुन्हा नोंद केला आहे. या प्रकरणात ३०४ अंतर्गत गंभीर कलम लावले आहे. आरोपी अल्पवयीन असल्यामुळे त्याला १४ दिवस निरीक्षणगृहात ठेवण्यासाठी मागणी न्यायालयात केली होती. हा गुन्हा गंभीर असून आरोपीला सज्ञान म्हणून कारवाई करण्यास अनुमती मिळावी; मात्र आरोपी मुलास निरीक्षणगृहात टाकण्यासाठी केलेली आमची मागणी न्यायालयाने फेटाळली आहे. मद्यप्राशन करून आरोपी गाडी चालवत होता हे सीसीटीव्हीमध्ये स्पष्ट झाले असून त्याविषयी आम्ही न्यायालयात माहिती दिली. याविषयी सत्र न्यायालयात आम्ही दाद मागत आहे, अशी माहिती पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे. |
आमदार रवींद्र धंगेकरांचे येरवडा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन !
आमदार रवींद्र धंगेकर यांच्या नेतृत्वात येरवडा पोलीस ठाण्यासमोर काँग्रेसकडून ठिय्या आंदोलन करण्यात आले. पुणे पोलिसांनी घेतलेल्या भूमिकेच्या निषेधार्थ हे आंदोलन करण्यात आले. ज्या पद्धतीने मुलाला तात्काळ जामीन झाला, त्यावरून पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. हातात नोटा घेऊन हे आंदोलन करण्यात आले. ‘सुटला कसा ? खाल्ले पैसे’, अशा घोषणाही या वेळी देण्यात आल्या. आमदार रवींद्र धंगेकर यांनी ट्वीट करत कल्याणीनगर मधील घटनेत कठोर कारवाई झाली पाहिजे, असे सांगितले.
भाजप प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ यांची पोलीस आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी !
पुणे हे विद्येचे माहेरघर आणि राज्याची सांस्कृतिक राजधानी आहे; मात्र गेल्या काही वर्षांपासून पुणे शहराच्या संस्कृतीला धक्का लागणारे प्रकार घडत आहेत. त्याला ‘नाईट-लाईफ’ कारणीभूत असल्याचे समोर येत आहे. यामुळे तरुण-तरुणी व्यसनाच्या अधीन होत आहेत. यातूनच अशा दुर्दैवी घटनांना आपल्याला सामोरे जावे लागत आहे. या पार्श्वभूमीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आम्ही केली आहे.