पुणे येथे मराठी भाषेत अधिवक्त्यांना सनद देण्याचा कार्यक्रम !

पुणे – अधिवक्त्यांनी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षण घेतले, तरी त्यांनी मराठी भाषेचा अभिमान बाळगत मराठी भाषेमध्ये वकिली करण्याला प्राधान्य द्यावे. अधिवक्त्यांना मराठीमध्ये सनद देण्याचा कार्यक्रम पुण्ो येथे होणे, हा योगायोग नाही. मराठी भाषेत सौंदर्य आणि नजाकत आहे, असे मत प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश महेंद्र महाजन यांनी व्यक्त केले. बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या वतीने मराठीत सनद प्रदान समारंभ न्यायालयाच्या अशोका हॉलमध्ये पार पडला, त्या वेळी ते बोलत होते. या वेळी बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, विद्यमान अध्यक्ष, उपाध्यक्ष, पालक सदस्य आणि पुणे बार असोसिएशनचे अध्यक्ष उपस्थित होते.

आतापर्यंत वकिलांना इंग्रजी भाषेमध्ये सनद दिली जात होती; मात्र आता मराठीमध्ये सनद देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. विधी क्षेत्राच्या इतिहासातील हा एक क्रांतीकारी निर्णय आहे, असे मत बार कौन्सिलचे उपाध्यक्ष राजेंद्र उमाप यांनी व्यक्त केले. तर मराठी अस्मिता टिकवण्याचे हे अभिनव पाऊल आहे, असे मत बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोव्याचे अध्यक्ष अधिवक्ता पारिजात पांडे व्यक्त केले.