एका साधिकेच्या नातेवाइकाला चौथ्या टप्प्याचा रक्ताचा कर्करोग झाला होता. ती या आजारपणातून वाचणे अशक्य होते; पण औषधोपचार आणि सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी सांगितलेले नामजपादी उपाय केल्याने ती या आजारातून बरी झाली. ‘आजारपणात रुग्णाने आणि त्याच्या नातेवाइकांनी नामजपादी उपाय केल्यास त्यांना कसा लाभ होतो ?’, याविषयीच्या अनुभूतींचा काही भाग २४.४.२०२४ या दिवशी पाहिला. आज पुढील भाग पाहू.
(भाग २)
या लेखाचा भाग १ वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/787036.html
५. रुग्ण नातेवाइकाची स्थिती गंभीर असतांना परात्पर गुरु डॉ. आठवले यांची अनुभवलेली कृपा !
५ अ. रुग्ण नातेवाइकाला ‘व्हेंटिलेटर’वर ठेवण्यात येणे आणि आधुनिक वैद्यांनी ‘रुग्ण नातेवाईक जगण्याची निश्चिती देता येत नाही’, असे सांगणे : ‘१.१२.२०२१ या दिवशी रुग्ण नातेवाइकाला ‘व्हेंटिलेटर’वर (टीप ५) ठेवले. आधुनिक वैद्य आणि परिचारिका तिला वाचवण्यासाठी अथक प्रयत्न करत होते. रात्री आधुनिक वैद्यांनी तिच्या वडिलांना सांगितले, ‘‘आम्ही तिला वाचवण्याचे सर्व प्रयत्न केले आहेत; पण आम्ही तिच्या जगण्याची निश्चिती देत नाही. तिचे शरीर ‘व्हेंटिलेटर’वर चालू आहे, तरीही सकाळी १० वाजेपर्यंत वाट पाहूया.’’ हे ऐकून तिच्या वडिलांना धक्का बसला.
टीप ५ – व्हेंटिलेटर : कृत्रिम रितीने श्वासोच्छ्वास चालू ठेवण्यासाठी लावलेले यंत्र
५ आ. आम्ही आधुनिक वैद्यांना विचारले, ‘‘परिचारिका तिच्या जवळ नामजप लावू शकतात का ? आणि प.पू. दास महाराज यांनी दिलेला मंत्र लिहिलेली चिठ्ठी ठेवू शकतात का ?’’ तेव्हा त्यांनी आम्हाला त्यासाठी अनुमती दिली.
५ इ. सर्व कुटुंबियांनी सद्गुरु गाडगीळकाकांनी रुग्ण नातेवाइकासाठी सांगितलेला नामजप केल्यावर तिच्यावर त्वरित उपाय होऊन ती शुद्धीवर येणे : २.१२.२०२१ या दिवशी सकाळी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांनी तिच्या डाव्या डोळ्याच्या भुवईच्या वर कपाळावर तळहात उभा ठेवून ‘ॐ’ हा नामजप करायला सांगितला. आम्ही सर्व जण तिच्यासाठी हा नामजप करत होतो. तेव्हा ‘त्या नामजपाचे चैतन्य तिच्यापर्यंत पोचून तिच्यावरील वाईट शक्तीचे त्रासदायक आवरण नष्ट झाले आहे आणि संकट टळत आहे’, असे मला आतून जाणवले. न्यास करून नामजप केल्यावर ती लगेचच शुद्धीवर आली. तिच्यावरील वाईट शक्तीचे त्रासदायक आवरणही लगेच न्यून झाले. श्री गुरूंच्या कृपाशीर्वादामुळे सकाळी ८.४७ वाजता तिने हात हलवला आणि सकाळी १० वाजता ती शुद्धीवर आली. हे पाहून आधुनिक वैद्य आणि परिचारिका आश्चर्यचकित झाले.
५ ई. रुग्ण नातेवाइकाची स्थिती पाहून साधिकेला भीती न वाटणे : दुपारी ३ वाजता मी तिला भेटायला अतीदक्षता विभागात गेले. ती बोलत होती; पण तिला पुष्कळ धाप लागली होती. तिला लावलेला प्राणवायू (ऑक्सीजन), सलाईन आणि तिची ती स्थिती पाहून मला भीती वाटली नाही. मी समवेत आणलेले हनुमानाचे छोटे चित्र तिच्या डोक्याच्या डाव्या बाजूला ठेवले.
५ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने रुग्ण नातेवाईक अतीदक्षता विभागातून बाहेर येणे : २.१२.२०२१ आणि ३.१२.२०२१ या दोन दिवसांत मला एक क्षणही झोप लागली नाही. माझा नामजप अखंड चालू होता. ३.१२.२०२१ या दिवशी दुपारी तिला अतीदक्षता विभागातून बाहेर आणले. तिला रुग्णशिबिकेवरून (‘स्ट्रेचर’वरून) खोलीत नेत असतांना मी कृतज्ञता म्हणून मनात ‘भगवान श्रीकृष्णाचा विजय असो ! प.पू. भक्तराजांचा विजय असो !’, हा जयघोष केला. ‘हा दिवस पहायला मिळणे’, ही केवळ परात्पर गुरु डॉक्टरांची कृपा आहे.
६. आधुनिक वैद्यांनी अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची पुढची प्रक्रिया चालू केल्यावर रुग्ण नातेवाइकाला झालेले त्रास
६ अ. रुग्ण नातेवाइकाला धाप लागणे आणि वैद्यकीय चाचणीद्वारे तिच्या छातीत पाणी झाल्याचे समजणे : तिला अतीदक्षता विभागातून बाहेर आणल्यानंतर आधुनिक वैद्यांनी अस्थिमज्जा प्रत्यारोपणाची पुढील प्रक्रिया चालू केली; पण ३.१२.२०२१ या दिवशी तिला धाप लागत होती. ५.१२.२०२१ या दिवशी आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘तिला धाप का लागत आहे ?’, हे तपासण्यासाठी छातीचे स्कॅनिंग (HRCT) (टीप ६) करावे लागेल.’’
टीप ६ – HRCT – High Resolution Computed Tomography : हे उच्च क्षमतेचे तंत्रज्ञान आहे, ज्यात शरिराच्या आतील भागाचे चित्र अधिक स्पष्ट आणि बारकाव्यांसह मिळते.
या चाचणीचा अहवाल अचूक येण्यासाठी सद्गुरु गाडगीळ यांनी सांगितल्याप्रमाणे ‘निर्गुण’ हा नामजप केला, तसेच तिच्या छातीवर आलेले वाईट शक्तीचे आवरण नष्ट होण्यासाठी प्रार्थना केली. त्यानंतर या चाचणीतून तिच्या छातीत पाणी झाल्याचे कळले.
६ आ. रुग्ण नातेवाइकाच्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ची संख्या अल्प होणे आणि ती वाढण्यासाठी सद्गुरु गाडगीळ यांनी नामजप करण्यास सांगणे : सर्वसाधारणपणे निरोगी व्यक्तीच्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ची (रक्तातील तबकडीच्या आकाराच्या पेशींची) संख्या दीड लाख ते साडे चार लाख प्रती मायक्रोलिटर, इतकी असते. वाईट शक्तींच्या त्रासामुळे रुग्ण नातेवाइकाच्या शरिरातील ‘प्लेटलेट्स’ची संख्या अल्प झाली होती. आदल्या दिवशी नामजप करतांना ‘नामजप तिच्यापर्यंत पोचत नाही’, असे मला जाणवत होते. त्या दिवशी सद्गुरु गाडगीळकाकांनी नामजपातील चैतन्य तिच्यापर्यंत पोचण्यातील अडथळे दूर होण्यासाठी आणि ‘प्लेटलेट्स’ची संख्या वाढण्यासाठी नामजप करण्यास सांगितला.
६ इ. १२ घंटे नामजप करूनही ‘प्लेटलेट्स’ वाढत नव्हत्या. त्या वेळी ‘हे वाईट शक्तींचे निर्गुणातील आक्रमण आहे. त्यामुळे वाईट शक्ती सर्व स्तरांवर अडचणी आणत आहेत’, असे मला जाणवले.
६ ई. रुग्ण नातेवाइकाच्या खोलीत जाता येत नसल्याने भ्रमणभाषमधील तिच्या छायाचित्रावरील आवरण काढल्यावर प्रत्यक्षातही तिच्यावरील आवरण न्यून होणे : तिच्या शरिरावर वाईट शक्तीचे पुष्कळ आवरण होते. आम्ही तिच्या खोलीत जाऊ शकत नव्हतो; पण परात्पर गुरु डॉक्टरांनी सूक्ष्मातून सुचवल्याप्रमाणे भ्रमणभाषमधील पडद्यावर तिचे छायाचित्र ठेवून त्यावरील आवरण काढल्यावर तिच्या शरिरावरील आवरण प्रत्यक्षातही न्यून होत होते.
६ उ. दुसर्या दिवशी ‘तिच्या खोलीत देवदेवता असून त्या युद्ध करून वाईट शक्तींना हरवत आहेत’, असे मला दिसत होते.
६ ऊ. रुग्ण नातेवाइकाच्या रक्तातील ‘क्रीएटिनिन’ वाढणे आणि ते न्यून करण्यासाठी तिचे ‘डायलिसिस’ करावे लागणे : १०.१२.२०२१ ते १५.१२.२०२१ या कालावधीत तिच्या रक्तातील क्रीएटिनिन (creatinine) ५.१ मिलिग्रॅम प्रती डेसिलिटर, इतके वाढले होते. (सर्वसाधारणपणे निरोगी स्त्रियांच्या रक्तातील क्रीएटिनिनचे प्रमाण ०.६ ते १.१ मिलिग्रॅम प्रती डेसिलिटर, इतके असते.) त्याचा परिणाम तिच्या मूत्रपिंडावर झाला असता. त्यामुळे तिच्या रक्तातील ‘प्लेटलेट्स’ वाढत नव्हत्या. ‘डायलिसिस’ (टीप ७) केल्यावर क्रीएटिनिन न्यून होते. १४ आणि १५.१२.२०२१ या दिवशी तिचे ‘डायलिसिस’ केले. ते केल्यावर तिच्या रक्तातील क्रीएटिनिन २.३ मिलिग्रॅम प्रती डेसिलिटर इतके झाले.
टीप ७ – डायलिसिस : मूत्रपिंडांची कार्यक्षमता न्यून झाल्याने रक्तातील अशुद्ध घटक आणि अधिक मात्रेतील द्रवपदार्थ यंत्राद्वारे शरिरातून बाहेर काढून टाकण्याची प्रक्रिया.
७. ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’, हा ग्रंथ समवेत ठेवल्यावर साधिकेला आलेल्या अनुभूती
७ अ. या ग्रंथावरील परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र पाहून ‘त्यातून चैतन्य मिळत आहे’, असा भाव ठेवणे आणि त्यामुळे त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होणे : मी ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ या ग्रंथाचे ३ खंड समवेत घेऊन गेले होते. त्यांतील परात्पर गुरु डॉ. आठवले साधकांसाठी नामजप करत असलेले छायाचित्र पाहून मी ‘त्यातून चैतन्य मिळत आहे’, असा भाव ठेवायचे. त्यामुळे माझ्यावरील त्रासदायक शक्तीचे आवरण नष्ट होत होते.
७ आ. या ग्रंथांमुळे ‘गुरुदेव माझ्या समवेत आहेत’, असे वाटून माझ्या मनावर ताण न येता मला हलके वाटत होते.
७ इ. वैद्यकीय चाचणी करतांना रुग्ण नातेवाइकाने ग्रंथ समवेत नेणे आणि त्यातील चैतन्यामुळे तेथील वाईट शक्तीचे आवरण नष्ट होत असल्याचे जाणवणे : रुग्ण नातेवाइकाची कुठलीही वैद्यकीय चाचणी करायची असली, तरी ती ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ समवेत घेऊन जायची. ‘त्यातील चैतन्याने आम्ही जिथे जात होतो, तेथील वाईट शक्तीचे आवरण नष्ट होत आहे’, असे मला जाणवत होते.
७ ई. ग्रंथ हातात घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करत असतांना त्यांनी साधिकेची आठवण काढल्याचा निरोप मिळणे आणि त्यातून ‘त्यांचे सर्वांकडे लक्ष असते’, हे लक्षात येणे : मी प्रतिदिन हा ग्रंथ हातात घेऊन परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करायचे. तेव्हा मला ‘माझे बोलणे ते ऐकत आहेत’, अशी अनुभूती यायची. एकदा मला आध्यात्मिक त्रास होत होता; म्हणून मी परात्पर गुरु डॉक्टरांना आत्मनिवेदन करत होते. त्याच वेळी त्यांनी माझी आठवण काढल्याचा निरोप मला मिळाला. तेव्हा ‘भगवंताचे सर्वांकडे लक्ष असते’, हे माझ्या लक्षात आले.
७ उ. ग्रंथ समवेत ठेवून नामजपादी उपाय केल्याने रुग्णालयातील रज-तमयुक्त वातावरणाचा त्रास न होणे : ‘१४ घंटे नामजप करणे, सतत स्वतःभोवतालचे वाईट शक्तीचे आवरण काढणे, अधूनमधून अत्तर आणि कापूर यांचे उपाय करणे अन् ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ हा ग्रंथ सतत समवेत ठेवणे’, यांमुळे रुग्णालयातील रज-तमयुक्त वातावरणाचा माझ्यावर परिणाम झाला नाही.
‘पुढील आपत्काळात साधकांनी सनातनचे ग्रंथ किंवा सात्त्विक उत्पादने स्वतःच्या समवेत ठेवल्यास त्यांना त्यातून चैतन्य मिळत राहील’, असे मला वाटले. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी संकलित केलेले ग्रंथ आणि सात्त्विक उत्पादने यांच्यातील चैतन्यामुळे बाहेरील भयावह वातावरणात मानसिक अन् आध्यात्मिक आधार मिळतो’, हे मी प्रत्यक्ष अनुभवले.
८. ‘रुग्ण नातेवाइकाला गणपतीचा आशीर्वाद मिळाला’, हे दर्शवणारी एक अनुभूती !
या रुग्णालयात गणपतीच्या मूर्तीची स्थापना केली आहे. या गणपतीला आम्ही प्रतिदिन प्रार्थना करायचो. रुग्ण नातेवाइकाला रुग्णालयातून सोडल्यावर (‘डिस्चार्ज’ मिळाल्यावर) तिच्या वडिलांनी गणपतीला मोदक अर्पण केले. तेव्हा गणपतीला वाहिलेले फूल त्या मोदकांमध्ये आपोआप पडले. ते पाहून ‘रुग्ण नातेवाइकाला गणपतीचा आशीर्वाद मिळाला’, असे मला वाटले.
९. रामनाथी आश्रमात येतांना परात्पर गुरु डॉक्टरांनी मोठ्या अपघातातून वाचवल्याची आलेली अनुभूती !
मागील काही वर्षांपासून मला सतत एक दृश्य दिसत होते, ‘माझा अपघात झाला आहे. त्यामध्ये माझ्या शरिरातील बरीच हाडे मोडली असून त्यातच माझा मृत्यू झाला आहे.’
मी रुग्ण नातेवाइकाला घरी सोडून रामनाथी आश्रमात परत येत होते. माझा भाऊ गाडी चालवत होता. काही अंतर पुढे आल्यावर आम्हा दोघांनाही ग्लानी आली आणि गाडी ‘डिव्हायडर’वर चढली. गाडीचा आवाज आल्यावर मला जाग आली. मी मोठ्याने ‘प.पू. डॉक्टर’, असा नामजप करत गाडीचे ‘स्टेअरिंग’ वळवले. त्याच क्षणी भावाने गाडी वळवली. या मोठ्या संकटातून परात्पर गुरु डॉक्टरांनीच आम्हाला वाचवले.’
(समाप्त)
– एक साधिका
|