रायगड जिल्ह्यात १७ ठिकाणी सामूहिक गदापूजन !

९०० हून अधिक भाविकांनी घेतली हिंदु राष्ट्राच्या निर्मितीसाठी प्रतिज्ञा !

कानसळ (पाली) गावातील हनुमान मंदिरात रामराज्याच्या स्थापनेसाठी प्रतिज्ञा घेतांना भाविक

अलीबाग (जिल्हा रायगड) – हनुमान जयंतीच्या निमित्ताने ‘गदापूजना’च्या माध्यमातून हिंदूंमधील शौर्य जागृत व्हावे आणि रामराज्याच्या कार्यासाठी बळ मिळावे, या उद्देशाने हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने देशभरात ७५७ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले. रायगड जिल्ह्यातही पेण, पनवेल, खोपोली, अलीबाग, नागोठणे या तालुक्यांत १७ ठिकाणी सामूहिक ‘गदापूजन’ करण्यात आले.

खोपोली येथे गदापूजन करतांना धर्मप्रेमी

खालापूर येथील कानसळ गावात हनुमानजयंतीच्या निमित्ताने प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. श्री. राजेंद्र पावसकर यांनी हनुमान जयंतीचे महत्त्व आणि शास्त्रानुसार हनुमंताची पूजा कशी करावी ? ते सांगितले.

अरड्याची वाडी (पाली)गावातील हनुमान मंदिरात गदापूजन करतांना धर्मप्रेमी

‘मारुतिरायांचे अनेक गुण आपल्यात आणण्याचा प्रयत्न केला, तर खर्‍या अर्थाने हनुमानजयंती साजरी होईल. अहंशून्यता, नम्रता, अखंड दास्यभक्ती, अखंड सावधान, सतत गुरुस्मरण, गुरूंना आपले सर्वस्व मानणे, समभावाने वागणे, प्रत्येकात देव आहे हा भाव आपल्यात निर्माण करणे, सतत शिकण्याच्या स्थितीत रहाणे, इतरांचे गुण पहाणे हे हनुमानाचे गुण आपल्यात आणण्यासाठी प्रयत्न करूया, असे ते त्यांच्या मार्गदर्शनात या वेळी म्हणाले.

या वेळी शंखनादाने कार्यक्रमाचा आरंभ करण्यात आला. त्यानंतर सामूहिक प्रार्थना, ‘गदापूजन’ विधी, हनुमानाची आरती, मारुतिस्तोत्र, श्री हनुमान चालीसा, तसेच ‘श्री हनुमते नम: ।’ हा सामूहिक नामजप करण्यात आला. तसेच ‘धर्मसंस्थापनेसाठी मारुतिरायांचे गुण कसे आत्मसात करावेत ?’ याविषयी मार्गदर्शनही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी ‘रामराज्याच्या स्थापनेसाठी सामूहिक प्रतिज्ञा’ घेण्यात आली.

संतांची वंदनीय उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली, तसेच श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे पदाधिकारी अन् युवावर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.

विशेष

खालापूर तालुक्यातील कानसळ या गावातील धर्मप्रेमींनी गदापूजनाच्या कार्यक्रमाचे यू ट्यूबच्या माध्यमातून थेट प्रक्षेपण केले होते.