‘२२.२.२०२४ या दिवशी भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली कथा ऐकून मला माझ्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव झाली.
१. भक्तीसत्संगात श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांनी सांगितलेली एका भक्ताची कथा
‘पूर्व बंगाल प्रांतात असलेल्या सप्तग्राम नगरीत गोवर्धनदास नावाचे प्रशासक होते. ते अत्यंत धनवान होते. गोवर्धनदासला ‘रघुनाथदास’ नावाचा एकुलता एक पुत्र होता. रघुनाथदासला उपजतच ईश्वराची ओढ होती. एकदा त्यांच्याकडे श्री चैतन्य महाप्रभूंचे परमशिष्य श्री हरिदास आले होते. हरिदासांच्या सत्संगाने रघुनाथाची भगवंताविषयीची भक्ती वाढली. पुढे ऐन तारुण्यातही या भक्तीरसापुढे त्याला संसारातील धन, वैभव, ऐहिक सुख सर्वकाही नीरस वाटू लागले.
काही दिवसांनी रघुनाथ जगन्नाथपुरी येथे श्री चैतन्य महाप्रभु यांना भेटायला गेला. रघुनाथला पहाताच महाप्रभूंना आनंद झाला. त्यांनी त्यांच्या एका शिष्याला बोलावून त्याला रघुनाथची सर्व व्यवस्था पहाण्यास सांगितले. ते शिष्य रघुनाथला आपल्या कुटीत घेऊन गेले. स्नानादी कर्मे झाल्यानंतर रघुनाथने भोजन केले. त्या भोजनात बरेच पदार्थ होते. असे सलग ४ – ५ दिवस झाल्यावर रघुनाथच्या मनात विचार आला, ‘अशा प्रकारे मी स्वादिष्ट भोजन खाऊ लागलो, तर माझ्यामध्ये वैराग्य कसे बरे निर्माण होणार ?’
तेव्हा त्यांनी आश्रमात न जेवता त्या गावात भिक्षा मागण्यास आरंभ केला. ‘रघुनाथदास श्रीमंत घराण्यातील आहेत’, हे भक्तांना समजल्यामुळे भक्त त्यांना भिक्षेमध्ये चांगलेच भोजन देऊ लागले. ते पाहून त्यांनी भिक्षा मागणे बंद केले आणि मंदिराच्या दुसर्या द्वारावर होत असलेल्या भंडार्याच्या ठिकाणी जाऊन साधे भोजन ग्रहण करणे चालू केले.’
२. कथा ऐकल्यावर साधकाला त्याच्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव होणे
ही कथा ऐकल्यावर मला वाटले, ‘मी स्वतः पूर्णवेळ साधना करण्याच्या उद्देशाने गुरूंच्या आश्रमात आलो आहे. आश्रमात येऊन साधना चांगल्या प्रकारे होण्यासाठी आणि मनात वैराग्य निर्माण होण्यासाठी खरेतर माझे प्रयत्न होणे अपेक्षित होते; परंतु असे न करता उलट माझ्या मनात इच्छा, वासना आणि आवड-नावड केंद्रच फोफावत आहे का ?
आश्रमातील साधे, सात्त्विक आणि पौष्टिक भोजन ग्रहण करण्याच्या ऐवजी चमचमीत खावेसे वाटणे, आवड-नावड निर्माण होणे, गोड पदार्थ (मिष्टान्न) खावेसे वाटणे, उंची वस्त्रे परिधान करायला हवीत, असे विचार येणे, म्हणजे देहाविषयी आसक्ती निर्माण होणे आहे. हे माझी देहबुद्धी वाढण्याचे लक्षण आहे. याउलट साधनेत देहबुद्धी अल्प करायची असते.’
गुरुकृपेने मला माझ्या अयोग्य विचारप्रक्रियेची जाणीव झाली. ‘मी आश्रमात केवळ साधना करण्याच्या उद्देशानेच आलो आहे. येथे राहून मला इच्छा आणि वासना न्यून करायच्या आहेत. माझ्यामध्ये वैराग्य निर्माण करायचे आहे’, या विचाराने मला हलकेपणा जाणवू लागला.
‘हे गुरुदेवा, माझ्याकडून स्वतःत वैराग्य निर्माण करण्याचे प्रयत्न अत्यल्प झाले’, त्याबद्दल मी आपल्या चरणी अंतःकरणापासून क्षमायाचना करतो.’
– श्री. नरेंद्र सुर्वे, मथुरा, उत्तरप्रदेश. (२४.३.२०२४)