रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांचा अर्ज प्रविष्ट

लोकसभा निवडणूक २०२४

डावीकडून किरण सामंत, नारायण राणे, प्रमोद सावंत, रवींद्र चव्हाण, दीपक केसरकर आणि अर्ज स्वीकारतांना निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह

रत्नागिरी, १९ एप्रिल (वार्ता.) – रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नारायण राणे यांनी आज १९ एप्रिल या दिवशी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी एम्. देवेंदर सिंह यांच्याकडे सुपुर्द केला. या वेळी त्यांच्या समवेत गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत, मंत्री रवींद्र चव्हाण, मंत्री दीपक केसरकर आणि  उद्योजक किरण सामंत यांची उपस्थिती होती. उमेदवारी अर्ज प्रविष्ट (दाखल) करण्यापूर्वी महायुतीची मोठी फेरी (रॅली) काढण्यात आली.

मारुति मंदिर येथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर  फेरी निघाली. यामध्ये भाजप-शिवसेना-राष्ट्रवादी काँंग्रेस अजित पवार गट, रासप, आर्.पी.आय., मनसे यांसह पक्षांचे नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्ते सहस्रोंच्या संख्येने सहभागी झाले होते. फेरी जयस्तंभ येथे आल्यानंतर तेथील सभेत मंत्री नारायण राणे, मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि पालकमंत्री उदय सामंत यांनी उपस्थितांना संबोधित केले. या वेळी उपमुखमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा संदेश वाचण्यात आला.

देश महासत्ता होण्यासाठी पुन्हा मोदी सरकार आवश्यक ! – मुख्यमंत्री प्रमोद सावंत

गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मागील १० वर्षांत केलेले काम हा केवळ ‘ट्रेलर’ होता. ते तिसर्‍यांदा पंतप्रधान झाल्यानंतर देश महासत्ता बनेल. ‘सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास’, ही संकल्पना खर्‍या अर्थाने सत्यात उतरवण्यासाठी महायुतीचे उमेदवार म्हणून नारायण राणे यांना प्रचंड मताने निवडून देऊया. नारायण राणे अडीच लाखांपेक्षा अधिक मताधिक्याने जिंकतील. उमेदवारी घोषित व्हायला वेळ लागला असला, तरी याचा परिणाम मतदानावर होणार नाही.

राणेसाहेबांना सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ ! – उद्योगमंत्री उदय सामंत

उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, ‘‘शिवसेनेकडून किरणभैय्या सामंत इच्छुक होते; मात्र ज्या वेळी महायुतीचे उमेदवार म्हणून केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना उमेदवारी घोषित झाली, त्याच क्षणापासून आम्ही राणसाहेबांचे प्रचाराचे काम करायला चालू केले आहे. त्यामुळे शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता यासाठी जोमाने काम करील. राणेसाहेबांना विजयी करून सर्वाधिक मताधिक्य मिळवून देऊ.’’