दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात; यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !…

समृद्धी महामार्गावर सिन्नर येथे अपघात

पुणे – समद्धी महामार्गावर १८ एप्रिलला सकाळी सिन्नर तालुक्यातील खंबाळे शिवारात महिंद्रा स्कॉर्पिओचा भीषण अपघात होऊन २ जण ठार, तर ३ जण गंभीर घायाळ झाले आहेत.


यमराजाची वेशभूषा करून निवडणुकीचा अर्ज भरला !

माढा – मराठा समाजाचे समन्वयक राम गायकवाड यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरतांना रेड्यावर बसून यमराजची वेशभूषा परिधान करून सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात आले होते. ‘देशभरात भ्रष्टाचार बोकाळलेला आहे’, अशी खंत त्यांनी व्यक्त केली. (असे मुखवटे धारण करणारे निवडून आल्यावरही काही काम करतील का ? – संपादक)

संपादकीय भूमिका : हे यमदेवतेचे विडंबन असून त्याचा अवमानच आहे !


‘ब्रिटानिया’च्या गोदामाला आग

मुंबई – दक्षिण मुंबईत ब्रिटानिया आस्थापनाच्या गोदामाला भीषण आग लागली. अग्नीशमनदलाच्या चार ते पाच गाड्या घटनास्थळी आल्या आणि त्यांनी आग विझवली.


ठाण्याची जागा शिंदेंचीच !

मुंबई – ठाणे आणि पालघर या दोन मतदारसंघांविषयी खडाजंगी चालू असली, तरी या दोन्ही जागा शिवसेनेकडे जाण्याची अधिक शक्यता आहे. ४ दिवसांत या जागांचा निर्णय होणार असल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. एकनाथ शिंदे यांनी दक्षिण मुंबई, तसेच उत्तर पश्चिम मुंबई या दोन मतदारसंघांवरील दावा सोडल्यास आम्ही ठाणे आणि पालघर शिंदे गटाला लगेचच देऊन टाकू, अशी भाजपच्या राज्यातील नेत्यांची भूमिका असल्याचे समजते.


मुंबईत भाजपच्या फलकावर राज ठाकरे यांचे छायाचित्र !

मुंबई – महायुतीकडून मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्या वेळी लावलेल्या फलकावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे छायाचित्र होते; परंतु ‘प्रहार’चे संस्थापक, अध्यक्ष बच्चू कडू यांचे छायाचित्र नव्हते. कडू यांनी गेल्या काही दिवसांत अनेकदा अमरावतीच्या खासदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांच्यावर टीका केली आहे.


महाड एम्.आय.डी.सी.तील आस्थापनामध्ये मध्यरात्री ६ स्फोट !

रायगड – महाड एम्.आय.डी.सी.तील ‘ॲस्टेक लाईफ सायन्सेस’ आस्थापनामध्ये मध्यरात्री ६ स्फोट झाले. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. अग्नीशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात आले असून आग नियंत्रणात आली आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी मोठ्या प्रमाणात फोमचा वापर करण्यात आला. स्फोट झाला, तेव्हा आस्थापनात २५ कामगार होते.