शरिरातील विविध वेगांना किंवा संवेदनांना रोखणे म्हणजे आजारांना निमंत्रणच !

महर्षि वागभट्ट यांनी ‘अष्टांग हृदय’ या ग्रंथात ‘रोगानुत्पादनीय’ हा अध्याय सांगितला आहे. यामध्ये रोग होऊ नये, यासाठी महत्त्वाची काळजी, म्हणजे आपल्या शरिराला जाणवणार्‍या संवेदना रोखू नये. यालाच ‘वेग’ असे नाव महर्षि वागभट्ट यांनी दिलेले आहे. आपल्या शरिरात १३ प्रकारचे वेग सांगितलेले आहेत. त्यांना कधीही बलपूर्वक रोखू नये. त्यांचे वेग रोखल्यास विविध शारीरिक तक्रारी निर्माण होऊन पुढे आजार होऊ शकतात. हे १३ प्रकारचे वेग कोणते ? ते बघूया.

छायाचित्र सौजन्य : ए बी पी लाईव्ह

१. अधोवात – पोटात होणार्‍या वायूचे निःसरण आणि ढेकर

२. मलवेग     ३. मूत्रवेग       ४. शिंका येणे

५. तहान       ६. भूक          ७. झोप

८. खोकला    ९. परिश्रमाने लागणारा दम

१०. जांभई     ११. अश्रू      १२. उलटी      १३. शुक्रवेग

आपण वरीलपैकी कोणताही वेग रोखून धरल्यास त्याचे काय दुष्परिणाम होतात ? याचा प्रत्येकाने कधी ना कधी अनुभव घेतलेला असतोच. जसे की, पुष्कळ भूक लागली असूनही कामात व्यस्त असल्यामुळे जेवता आले नाही, तर चक्कर, डोके दुखणे, आम्लपित्त होणे असे त्रास चालू होतात. आज आपण प्रत्येक वेगाला अडवून ठेवल्यास काय काय त्रास होऊ शकतो ? ते समजून घेणार आहोत, जेणेकरून या संवेदना आपल्याकडून दुर्लक्षित होणार नाहीत आणि स्वतःचे आरोग्य अबाधित राहील. पुढील माहितीमध्ये काही साधे सोपे घरगुती उपायही सांगितले आहेत; परंतु आपल्याला झालेला त्रास आणि त्यावरचे उपचार हे वैद्यांकडूनच करून घ्यायला हवेत.

वेगाला अडवून ठेवल्यास कोणता त्रास होऊ शकतो ?

वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर

१. पोटात होणारा वायू : पोटात होणार्‍या वायूचे निःसरण बलपूर्वक रोखल्यास पोट दुखणे, चक्कर येणे, भूक न लागणे, डोळ्यांसमोर अंधारी येणे, अशी लक्षणे दिसून येतात. अशा वेळी घरातील ज्येष्ठ मंडळी आपल्याला ‘थोडासा ओवा खाऊन त्यावर गरम पाणी पी’, असे सांगतात. पोट शेकल्यानेही रुग्णांना बरे वाटते. ढेकर रोखून धरली, तर तोंडाला चव नसणे, कंप सुटणे, छातीमध्ये बांधल्याप्रमाणे वाटणे, उचकी लागणे असे विकार होतात.

२. शौचाचा वेग : हा वेग आला असतांना वेळेत शौचास जाणे शक्य न झाल्यास पोटर्‍यांत गोळे येणे, सर्दी, डोके दुखणे, वायू उलट गतीने वर चढणे, शौचाच्या जागी कापल्याप्रमाणे वेदना, छातीत दुखणे असे विकार उद्भवतात. यावर पोटाला तेल लावून शेकणे, हा प्राथमिक उपचार करू शकतो; पण आराम न पडल्यास वैद्यांचा सल्ला घ्यावा.

३. लघवीचा वेग : हा वेग रोखून धरल्याने वरीलप्रमाणे सर्व लक्षणे दिसतातच, याखेरीज सर्व अंग दुखणे, ओटीपोटात दुखणे, जांघेत दुखणे, मुतखडा असे विकार होऊ शकतात. यावर केले जाणारे सर्व उपचार हे वात न्यून करण्यासाठीचे असतात.

४. शिंका येणे : शिंक रोखल्यास डोके दुखणे, मान अखडणे, चेहर्‍याचा ‘पॅरालिसिस’ (अर्धांग वायू) असे विकार होऊ शकतात.५. तहान : तहान लागलेली असतांना बराच वेळ पाणी न प्यायल्यास सर्व अंग कोरडे होणे, सर्व शरीर उत्साहरहित असणे, शरिराला जडपणा येणे, बहिरेपणा, चक्कर येणे अशी लक्षणे उत्पन्न होतात.

६. भूक : भूक लागलेली असतांना काही न खाल्ल्यास संपूर्ण शरिरामध्ये वेदना होणे, तोंडाला चव नसणे, शरीर थकल्याप्रमाणे वाटणे, चक्कर येणे असे विकार उद्भवतात. अशा वेळी घाईघाईत पोटभर न जेवता भाताप्रमाणे हलके असे अन्न घेऊन आणि त्यात तूप घालून गरम गरम अन् अल्प प्रमाणात खावे.

७. झोप : झोप आलेली असतांना वेळेत न झोपल्यास गुंगी येणे, डोके आणि डोळे जड होणे, आळस, जांभया येणे, अंग मोडून येणे असे विकार होतात. अशा वेळी सर्वप्रथम झोप पूर्ण घ्यावी आणि शरिराला मालिश करून घ्यावे.

८. खोकला : खोकला येत असतांना तो अडवल्यास तो अजून वाढतो, दम लागतो, तोंडाला चव नसते, उचकी लागणे किंवा हृदयविकारही उत्पन्न होऊ शकतात.

९. परिश्रमाने लागणारा दम : शारीरिक श्रम झाल्यानंतर जो दम लागतो, त्याला ‘श्रम श्वास’ असे म्हणतात. तो रोखून धरल्यास हृदयाची व्याधी, बेशुद्ध होणे असे विकार होऊ शकतात. यामध्ये पुरेशी विश्रांती घेणे आवश्यक आहे.

१०. जांभई : जांभई अडवून ठेवल्यास शिंका अडवल्याने जे परिणाम होतात, तसेच परिणाम इथेही होतात. आपल्याला कंटाळा आल्यानंतर जांभई येते. थकवा आल्यानंतर श्वासोच्छ्वास हवा तसा होत नाही. त्यामुळे शरिरात कमी पडत असणार्‍या प्राणवायूची पूर्तता करण्यासाठी हवा जोराने आत घेतली जाते, त्यालाच ‘जांभई’ म्हणतात.

११. अश्रू : डोळ्यांतून अश्रू येणे बलपूर्वक थांबवल्यास नाक वहाणे, डोके-डोळे दुखणे, मान जखडणे, चक्कर येणे, अशी लक्षणे निर्माण होतात.

१२. उलटी : ही जाणीवपूर्वक थांबवल्यास त्वचेवर गांधी उठणे, अंगावर चट्टे येणे, कोड फुटणे, खाज सुटणे असे विविध त्वचेचे विकार होतात. याखेरीज ताप येणे, खोकला, दम लागणे, मळमळणे, सूज येणे असे विविध विकार निर्माण होतात.

१३. शुक्रवेग : वीर्यस्खलनाचा वेग रोखल्याने गुप्तांगात वेदना होणे, सूज येणे, संपूर्ण शरिरात फुटल्याप्रमाणे वेदना होणे, असे एक ना अनेक विकार निर्माण होतात. वयात येणार्‍या मुलांना योग्य समुपदेशन, योग्य शिक्षण मिळाल्यास मुलांच्या मनातील न्यूनगंड, भीती आणि शंका दूर होऊ शकतात. पालकांनीही वयात येणार्‍या मुलांचे वैद्यांकडून समुपदेशन करून घ्यावे.

वरील सर्व लक्षणे बघता आपल्याला एक गोष्ट लक्षात येते की, आपल्या शरिरात संवेदना निर्माण करण्याचे काम मुख्यतः वातामुळे घडत असते. वाताची गती अडवल्यामुळे वाताचे संचरण विभिन्न ठिकाणी विकृत पद्धतीने व्हायला लागते आणि म्हणून वरील विकार निर्माण होतात. या सर्व विकारांवर वात न्यून करणारे उपचार जसे की, मालिश, वाफ घेणे, नाकात तेल घालणे, पोटातून स्निग्ध पदार्थ घेणे, बस्ती घेणे किंवा इतर पंचकर्म असे विविध उपचार वैद्य करतात.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे (१५.४.२०२४)