चीनच्या विस्तारवादाला चाप लावण्यासाठी लडाखच्या अतीदुर्गम भागात चालू असलेली पायाभूत सुविधांची निर्मिती या अतीशीत आणि अतीउंचीवरील वाळवंटात रहाणार्या लोकांसाठी पुरवण्यात येणार्या मूलभूत सुविधा, पर्यटनाच्या माध्यमातून होत असलेला अर्थव्यवस्थेचा विकास, प्रस्तावित स्वतंत्र केंद्रीय विद्यापिठामुळे होणारा शिक्षण क्षेत्राचा विकास, केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा मिळाल्यामुळे जम्मू-काश्मीरच्या राजकीय वर्चस्वातून मिळालेली मुक्ती या सगळ्याकडे हेतुपुरस्सर डोळेझाक करत लडाखमधील सोनम वांगचुक यांचे चालू असलेले ‘लडाख बचाव’ आंदोलन त्यांच्या हेतूवर शंका उत्पन्न करणारे आहे. भारतीय समाजमानस अनेकदा चुकीच्या नायकांचा आदर्श घेते किंवा चुकीच्या पद्धतीने नायक निवडते. ही भावनात्मकता आपल्याला बर्याचदा धोकादायक ठरली आहे. हे ‘इडियट’ (मूर्ख) सत्य आपण कधी स्वीकारणार ?
१. सोनम वांगचुक यांचे आंदोलन कशासाठी ?
मी या आंदोलनाला जाणीवपूर्वक ‘वांगचुक यांचे आंदोलन’ म्हटले आहे. हे आंदोलन चेरिंग दोरजे अध्यक्ष असलेल्या ‘लडाख ॲपेक्स बॉडी’ आणि ‘कारगिल डेमोक्रॅटिक अलायंस’ या दोन संघटनांच्या संयुक्त माध्यमातून चालू आहे. असे असले, तरी आंदोलनाचे कर्ते-करविते आणि बोलवते धनी सोनम वांगचुक हेच आहेत. त्यांच्या ‘इकोसिस्टीम’मधील (सरकारविरोधी प्रणालीमधील) माणसेच या आंदोलनाच्या अग्रभागी दिसत आहेत. लडाखमध्ये चालू असलेल्या या आंदोलनाची नोंद ‘अल-जझीरा’, ‘द वायर’, ‘द वीक’, ‘न्यूयॉर्क टाइम्स’, ‘बीबीसी’, चिनी ‘प्रपोगंडा’ (प्रचार) चालवण्याच्या आणि चीनकडून पैसे घेतल्यामुळे चर्चेत आलेले ‘द न्यूज क्लिक’, ‘द डिप्लोमॅट’, ‘द युरेशियन टाइम्स’, अशा अन् यांसारख्या भारतविरोधी भूमिकेसाठी प्रसिद्ध असलेल्या वृत्तसंस्थांनी घेतली आहे. अन्यथा लडाखसारख्या दुर्गम भागात चालू असलेल्या आंदोलनाची नोंद या स्तरावर घेण्यासारखे त्यात काय आहे की, लडाखमधील लोकशाहीविषयी ‘अल-जझीरा’ उर बडवून घेत आहे. ही वृत्तवाहिनी चालवण्यात येणार्या कतारमध्ये लोकशाहीची काय परिस्थिती आहे ? याकडे ही वाहिनी डोळे उघडून का पहात नाही ? ‘न्यूज क्लिक’ भारतात काय करते ? आणि कुणासाठी काम करते ? हे थोडेच लपून राहिले आहे. त्यामुळे या वृत्तवाहिन्यांनी या आंदोलनाची नोंद घेण्यामागे नक्की कुणाची प्रचार यंत्रणा आहे ? याची चौकशी होण्याची आवश्यकता आहे. हे सगळे ‘मॅगसेसे’ आणि ‘अशोका’चे जाळे नेटवर्क तर नाही ना, याचीही चाचपणी केली पाहिजे.
२. वांगचुक यांच्या आंदोलनातील मागण्या आणि त्यातील मेख
वांगचुक यांच्या आंदोलनातील मागण्या पहिल्या, तर त्यातील खरी गोम लक्षात आल्याविना रहात नाही. ‘लडाखला राज्याचा दर्जा द्या, राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात लडाखचा समावेश करा, लडाखमध्ये लोकसभेच्या २ जागा करा, स्वतंत्र लोकसेवा आयोगाची स्थापना करा’, या प्रमुख मागण्या आहेत. यासह ‘लडाखमध्ये लोकशाही पुनर्स्थापित करा, स्थानिक तरुणांना रोजगारात आरक्षण द्या, लडाखमध्ये होत असलेला लोकसंख्येतील असमतोल थांबवा’, अशा काही इतर मागण्याही आहेत. त्याला पर्यावरणाचीही जोड दिली गेली आहे. या आंदोलनातील काही ‘ठराविक’ मागण्या पाहिल्या की, ‘हे आंदोलक कोण आहेत ? आणि त्यांचे उद्दिष्ट काय ?’, याची स्पष्टता होते. यातील बहुतांश मागण्या अवास्तव आणि अविवेकी आहेत. जम्मू-काश्मीरला कथित स्वायत्तता देणारे कलम ३७० आणि ३५ अ (जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारी कलमे) निरस्त करतांना केंद्र सरकारने जम्मू-काश्मीर अन् लडाख हे २ स्वतंत्र केंद्रशासित प्रदेश निर्माण केले. या दोन्ही राज्यांतील संवेदनशील परिस्थिती, चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून असलेला धोका पहाता हा निर्णय योग्यही आहे. कथित स्वायत्ततेमुळेच आज काश्मीरचा प्रश्न अवघड बनला आहे. अशा परिस्थितीत लडाखचा समावेश राज्यघटनेच्या सहाव्या परिशिष्टात करणे धोकादायक ठरेल, म्हणजे पुन्हा स्वायत्तता असा याचा अर्थ होईल. लोकसंख्येतील असमतोलाविषयी आंदोलकांची मागणी ही धूळफेक करणारी आहे.
लडाखमध्ये कोणतेही मोठे उद्योगधंदे नाहीत. सरकारी नोकर्या तुटपुंज्या आहेत. सरकारी नोकरीसाठी उर्दू भाषा येणे क्रमप्राप्त आहे. येथील बहुतांश लोक पर्यटन अथवा लष्कराकडून मिळणार्या रोजगारावर अवलंबून आहेत. असे असतांना नोकरीतील कोणत्या आरक्षणाची मागणी हे आंदोलक करत आहेत ? हे एकदा सर्वांना कळायला हवे. येथील पर्यावरणाविषयी आंदोलक चिंता व्यक्त करत आहेत. भारताकडून लडाखच्या प्रामुख्याने सीमावर्ती भागात रस्ते, बोगदे, पूल असे पायाभूत सुविधांच्या विकासाचे काम जोरात चालू असतांनाच पर्यावरणाचा मुद्दा ऐरणीवर कसा येतो ? चीन आणि पाकिस्तान यांच्याकडून या भागातील पर्यावरणाचे लचके तोडणे चालू असतांना हे आंदोलक डोळ्यांवर कातडे ओढून का बसले होते ? लोकसभेच्या २ जागा आणि स्वतंत्र लोकसेवा आयोग या मागण्यांना सरकारनेही अनुकूलता दाखवली आहे.
३. केंद्र सरकारकडून करण्यात येत असलेला विकास
लडाखमध्ये सध्या पायाभूत सुविधांची निर्मिती मोठ्या प्रमाणात चालू आहे. त्यात सर्व ऋतूत वापरण्यायोग्य रस्ते बांधण्यावर सरकारचा जोर आहे. झोजीला खिंडीच्या खालून चालू असलेल्या बोगद्याचे काम झाल्यावर या भागाचा उर्वरित भारताशी १२ मास संपर्क चालू राहील. सध्या पठाणकोट-जम्मू-श्रीनगर-लेह हा एक आणि मनाली-सरचू-लेह हा दुसरा असे २ मार्ग लेहला जाण्यासाठी उपलब्ध आहेत; मात्र या मार्गांची उंची, अतीउंचीवरील खिंडी पहाता हिवाळ्यात हे मार्ग उपयोगाचे ठरत नाहीत, तसेच हे दोन्ही मार्ग चीन आणि पाकिस्तान यांच्या मार्याच्या टप्प्यात आहेत. त्यामुळे मनालीमार्गे पुढे निमु-पदम-दारचा असा एक मार्ग बांधून पूर्ण झाला आहे. त्यामुळे अतीदुर्गम पूर्व लडाख देशाच्या इतर भागाशी जोडला जाणार आहे. हा मार्ग लष्कर आणि सर्वसामान्य नागरिकांसाठी वरदान ठरणार आहे. विशेष म्हणजे हा मार्ग सर्व ऋतूत आणि १२ मास खुला रहाणार आहे. यामुळे चीनच्या प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून पाकिस्तानच्या नियंत्रण रेषेपर्यंत सैन्याची हालचाल आणि तैनात सोपी जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे चीन आणि पाकिस्तान यांच्या मार्याच्या टप्प्यात हा मार्ग नाही. हा मार्ग केवळ लष्करासाठी नाही, तर स्थानिक जनताही वापरू शकणार आहे. मग आता यात कुणाचे भले आहे, हे आंदोलक सांगतील का ? चीनला पायबंद घालण्यासाठी हे सुविधांचे जाळे अतिशय महत्त्वाचे आहे.
सरकारकडून या भागात पर्यटन आणि पर्यटनावर आधारित उद्योग, कृषी अन् त्यावर आधारित उद्योगांच्या निर्मितीवर भर देत आहे. फलोत्पादन, याकच्या दुधावर आधारित उत्पादने आदी उद्योगांना प्रोत्साहन दिले जात आहे. पश्मिना मेंढपाळांवर आधारित उद्योग चालू होत आहेत. त्याच्या प्रशिक्षणाची व्यवस्था केली जात आहे. यासह उर्वरित भारतातील अनेक स्वयंसेवी संस्था येथे अगदी निरपेक्ष भावनेने काम करत आहेत, याकडे सोनम वांगचुक कानाडोळा का करत आहेत ? हे समजण्यापलीकडचे आहे.
४. ‘वर्शिपिंग राँग हिरोज’ (चुकीच्या नायकाची पूजा)
वांगचुक यांनी शिक्षण आणि अन्य क्षेत्रात केलेले काम महत्त्वाचे आहेच. त्याचे श्रेयही कुणी नाकारत नाही; पण त्याची ढाल करून अशा अवास्तव मागण्या करणे निरर्थक आहे. लडाखमध्ये असे काम कोणत्याही सरकारी अथवा मोठ्या स्वयंसेवी संस्थेकडून साहाय्य न घेता करणारे अनेक जण आहेत; पण ते प्रकाशात आले नाहीत. स्वतःचे कथानक (नॅरेटिव्ह) चालवण्यासाठी उपयुक्त लोकांना हेरून त्यांना पुरस्कार देऊन, त्यांच्यावर चित्रपट काढून त्यांना मुख्य धारेत आणायचे काम अनेक वर्ष हेतूपुरस्सर चालूच आहे. त्यातूनच मग ‘थ्री इडियट’सारखा चित्रपट निघतो आणि काही जण हस्तिदंती मनोर्यात जाऊन बसतात. एकल विद्यालयाच्या माध्यमातून या भागात शैक्षणिक क्रांती झाली आहे. अध्यापनाच्या क्षेत्रात महिलांचे योगदान अधिक आहे. त्यामुळे आपल्या प्रोत्साहनाचा आणि कौतुकाचा थोडा झोत खरे काम करणार्यांकडेही गेला पाहिजे. हे खरे आदर्श आपण शोधले, तर ‘इडियट’ (मूर्ख) सत्याला आपल्याला सामोरे जावे लागणार नाही.
– श्री. विनय चाटी, उत्तर-पूर्व भारताचे अभ्यासक आणि संरक्षण तज्ञ, पुणे. (११.४.२०२४)
(श्री. विनय चाटी यांच्या फेसबुकवरून साभार)