पेपरफुटीत दोषी आढळलेल्या २ महाविद्यालयांची परीक्षा केंद्रे ३ वर्षांसाठी रद्दबातल !

परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत निर्णय !

प्रतिकात्मक छायाचित्रं

छत्रपती संभाजीनगर – डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापिठाने पेपरफुटी प्रकरणात दोषी आढळलेल्या २ महाविद्यालयांचे परीक्षा केंद्र पुढील ३ वर्षांसाठी गोठवले आहे. तसेच संबंधित कर्मचार्‍यांना परीक्षेचे कुठलेही कामकाज दिले जाणार नाही. कुलगुरु डॉ. विजय फुलारी यांच्या अध्यक्षतेखाली १५ एप्रिल या दिवशी झालेल्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. यासह २०, २५, २६ आणि २७ एप्रिल या दिवशी होणारे पेपरही पुढे ढकलले आहेत.

कन्नड येथील येथील पद्मावती कला महाविद्यालय आणि रांजणगाव येथील गुरुकुल महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर १२ एप्रिल या दिवशी विद्यापिठाने प्राध्यापकांचे पथक पाठवून हा प्रकार उघडकीस आणला होता. संस्थाचालकांच्या भ्रमणभाषमध्ये प्रश्नपत्रिका आढळल्या होत्या. भौतिकशास्त्राचे प्रा. डॉ.बी.एन्. डोळे यांच्या अध्यक्षतेखाली ४ सदस्यीय समितीने कुलगुरूंना १३ एप्रिल या दिवशी अहवाल सादर केला होता.


परीक्षा शुल्क न भरलेल्यांचे मूल्यांकन होणार नाही !

परीक्षा अर्ज आणि शुल्क भरलेले नाही, अशा विद्यार्थ्यांना विद्यापिठाने हॉल तिकीट दिले नाही.महाविद्यालयांनी त्यांना पी.आर्.एन्. म्हणजेच ‘पर्मनंट रजिस्ट्रेशन नंबर’वर (‘कायमस्वरूपीच्या नोंदणी क्रमांका’वर) परीक्षेसाठी बसवले आहे. अशा विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांचे मूल्यांकन केले जाणार नाही, असा निर्णय बैठकीत घेण्यात आला.

संपादकीय भूमिका 

महाविद्यालयेच पेपरफुटी करत असतील, तर विद्यार्थ्यांचे भवितव्य कसे घडेल, याचा विचारच न केलेला बरा !