ईश्वरी संकल्पना विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध करता येईल का ?

‘आजच्या अणुविज्ञान शास्त्रानुसार आपल्या जगतातील सर्व पदार्थ, वस्तू अंततः अणूंचे (ॲटम) बनले आहे. त्या अणूचेही स्वरूप स्पष्ट होत आहे. प्रत्येक अणू हा सामान्यतः ३ कणांचा (प्रोटॉन, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन यांचा) बनलेला आहे. त्याच्या संरचनेचे काही नियम आणि गुणधर्मही आहेत की, ज्याविषयी ‘असे का ?’, हा प्रश्न विचारता येत नाही. उदा. अणूच्या पहिल्या भ्रमणकक्षेत (ऑरबिट) दोनच इलेक्ट्रॉन असतात, पुढच्यात ८ इत्यादी. विविध मूलद्रव्यांचे गुणधर्म अगदी वेगवेगळे असतात; परंतु अणूमध्ये केवळ संख्येतच भेद असतो.

विज्ञानाच्या कसोटीवर सर्वांपेक्षा पलीकडे असलेले तत्त्व सिद्ध करणे, हेच मूळात अवैज्ञानिक !

अणूची संरचना कशापासून, कुणी निर्माण केली ? ती तशीच कुणाच्या सत्तेने रहाते आणि नष्ट होते, म्हणजे कुठे जाते ? या प्रश्नांची उत्तरे विज्ञानाकडेही नाहीत. या सर्व संरचनेच्या मूलस्थानी ईश्वर मानला की, सर्व उलगडा होतो. आज विज्ञानाची मर्यादा लक्षात आलेली आहे, ‘काय आहे ?’, याचे उत्तर विज्ञान देऊ शकते. ‘का आणि कशासाठी आहे ?’, याचे नेमके उत्तर विज्ञानाच्या मर्यादेच्या पलीकडे आहे. त्यामुळे या सर्वांपेक्षा पलीकडे असलेल्या तत्त्वाची सिद्धता विज्ञानाच्या कसोटीवर करणे, हेच मूळात अवैज्ञानिक-अशास्त्रीय आहे.

‘प्रत्येक गोष्ट प्रयोगशाळेत सिद्ध झाली पाहिजे’, असा आग्रह मूर्खपणाचा ठरू शकतो. माणसाचे सुख-दुःख, मान-अपमान विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होऊ शकतील का ? आपल्या प्रत्येकाच्या अनुभवाच्या साध्या गोष्टी विज्ञानाच्या कसोटीवर सिद्ध होणे अवघड आहे. विज्ञानाच्या सर्व मर्यादांच्या पलीकडे सर्वांचे अधिष्ठान असलेले तत्त्व विज्ञानाने तरी कसे सिद्ध करायचे ?

ईश्वरी तत्त्वाची सम्यक कसोटी पारखावी एवढी पात्रता आजच्या विज्ञानात नाही. याचे महत्त्वाचे कारण विज्ञान हे ईश्वराच्या प्रकृतीने निर्माण केलेल्या निसर्गातील नियम ज्ञात करून त्याचा उपयोग करण्यासाठी आहे. निसर्गाच्या पलीकडे असलेल्या प्रकृतीच्याही पलीकडे (परात्पर) असलेल्या ईश्वराची कशाची आणि कोणती परीक्षा निश्चित करणार ? आणि जे निश्चित केले जाईल, ते परिपूर्ण अन् योग्य आहे, हे कसे ठरवता येऊ शकेल ?

विज्ञानाच्या कोणत्याही शाखेतील प्रामाणिक खरा शास्त्रज्ञ हे निश्चित मान्य करील. ‘प्रकाश (लाईट)’ या विषयावरील एका मोठ्या ग्रंथाचा समारोप एका शास्त्रज्ञाने ‘बायबल’मधील ‘गॉड सेंड देअर मे बी लाईट, सो देअर इज लाइट’ (देव त्यांना प्रकाश पाठवतो आहे; म्हणून त्यांचा प्रकाश आहे), या वाक्याने केला. त्यामुळे मला वाटते की, यावर अधिक स्पष्टीकरणाची आवश्यकता नसावी.’

– प.पू. स्वामी वरदानंद भारती (वर्ष १९९८)

(साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, श्री क्षेत्र पंढरपूर)