अमेरिकेत हिंदूंवरील आक्रमणात लक्षणीय वाढ : भारतीय वंशाच्या खासदाराकडून चिंता व्यक्त

वॉशिंग्टन – अमेरिकेत हिंदु आणि हिंदूंची मंदिरे यांवरील आक्रमणांत लक्षणीय वाढ झाल्याविषयी भारतीय वंशाचे खासदार श्री. ठाणेदार यांनी चिंता व्यक्त केली आहे. ‘नॅशनल प्रेस क्लब’ येथे आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत खासदार श्री. ठाणेदार म्हणाले की, अमेरिकेत सध्या हिंदु धर्मावर आक्रमणे वाढत आहेत.

ऑनलाईन आणि इतर सामाजिक माध्यमांतून चुकीच्या माहितीचाही प्रसार केला जात आहे. आमच्या तक्रारीनंतरही अमेरिकन प्रशासन कोणतीही कारवाई करण्यास सिद्ध नाही. आतापर्यंत आक्रमणे करणार्‍यांपैकी कुणालाही अटक झालेली नाही. (स्वत:ला लोकशाहीचे ठेकेदार समजणार्‍या अमेरिकन प्रशासनाला हे लज्जास्पद ! – संपादक)

सौजन्य Diya TV 

खासदार ठाणेदार म्हणाले,

१. हिंदु समाजाच्या विरोधात आक्रमणे आणखी वाढतील, असे दिसते. अमेरिकेतील हिंदु समाजाने एकत्र येणे ही काळाची आवश्यकता आहे. मी तुमच्यासमवेत खंबीरपणे उभा आहे.

२. मी लहानपणापासून हिंदु धर्माचे आचरण करत मोठा झालो. हिंदु धर्म हा अतिशय शांतताप्रिय असा धर्म आहे. हिंदु धर्मात दुसर्‍या धर्मावर आक्रमण केले जात नाही. तरीही हिंदु समाजाचे चुकीचे चित्रण केले जाते, अपसमज पसरवले जातात आणि कधी कधी हे जाणीवपूर्वक केले जाते.

३. हिंदु मंदिरांवर नियोजित पद्धतीने आक्रमणे होत आहेत. त्यामुळे हिंदु समाजात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.