सोमय्या महाविद्यालयाच्या मराठी आणि संस्कृत भाषेच्या स्पर्धेत गंधर्व ठोंबरे यांचे सुयश !

मुंबई – येथील सोमय्या महाविद्यालयाच्या मराठी विभागाकडून आयोजित केलेल्या वक्तृत्व, पत्रलेखन, तसेच सुलेखन या तीनही स्पर्धांमध्ये सनातन संस्थेचा युवा साधक कु. गंधर्व ठोंबरे याचा प्रथम क्रमांक आला. यासह संस्कृत विभागाकडून आयोजित केलेल्या ‘शब्दजालम्’ या स्पर्धेत त्याला द्वितीय क्रमांक प्राप्त झाला. महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक समारंभात गंधर्व ठोंबरे याला शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार विजेते श्री. योगेश पवार यांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आला.

यापूर्वी गंधर्व ठोंबरे याने काही मासांपूर्वी कांजूरमार्ग रेल्वे स्थानक येथील घडलेल्या रेल्वे दुर्घटनेत एका व्यक्तीचे प्राण वाचवले होते. याविषयी ‘शिक्षणमूल्ये ही फक्त चार भिंतींत शिकायची नसून ती प्रत्यक्ष कृतीत आणायची असतात’, असे व्यासपिठावरून सांगत त्याचे जाहीररित्या कौतुक करण्यात आले. गंधर्व ठोंबरे याने या यशाचे श्रेय आपल्या आई-वडिलांसह शिक्षक आणि त्याचे आध्यात्मिक मार्गदर्शक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांना दिले आहे.