मानव हा शाकाहारी आहे, हे अनेक उदाहरणांमधून सिद्ध होते. असे असतांना मनात विचार येतो की, ज्यांना शाकाहाराचा संस्कार मिळाला, तेही तो पाळत नाहीत आणि ज्यांना हा संस्कार मिळालाच नाही, त्यांचा तर प्रश्नच नाही. हा एवढा विरोधाभास का म्हणून असावा ? जगभरात मोठ्या प्रमाणात मांसाहार केला जातो; मग आपल्याच देशात या गोष्टीला निषिद्ध का मानण्यात आले असावे ? या प्रश्नाचे उत्तर आहे, जरी निसर्गाचा नियम शास्त्रीय दृष्टीकोनातून मान्य झाला असला, तरी आपल्या हिंदु संस्कृतीचा ‘सहिष्णुता’ हा मूलभूत पाया आहे. जर आपण शाकाहार मान्य केला नसता, तर पोट भरण्यासाठी प्रतिदिन किती प्राण्यांची हत्या झाली असती ? हत्येचे पातक मानणारी संस्कृती मांसाहाराला कशी मान्यता देईल ?
त्याचसमवेत भारताची वाढती लोकसंख्या बघता आपण व्यापक प्रमाणात मांसाहार स्वीकारला असता, तर सगळ्यांना पोटभर अन्न मिळू शकले असते का ? कि अन्नाचे दुर्भिक्ष्य आपल्या वाट्याला आले असते ? कदाचित् हा सुद्धा विचार आपल्या तल्लख बुद्धीच्या पूर्वजांनी केला असेल. त्याचसमवेत रानावनातून हिंडणारे, तपस्या करणारे ऋषिमुनी कंदमुळे खाऊन जगत होते; म्हणूनही आपोआप शाकाहाराला महत्त्व प्राप्त झाले असेल. याखेरीज शाकाहार हा हत्याविरहित आणि सात्त्विक आहार आहेच आहे. त्यामुळे त्याचा स्वीकार मोठ्या प्रमाणात केला, असेही असू शकते.
– अपर्णा घाटे (साभार : मासिक ‘प्रसाद’, फेब्रुवारी २०१२)