US WarShip Repairing In India : भारताच्या ‘कोचिन शिपयार्ड’वर अमेरिकेच्या युद्धनौकांची होणार दुरुस्ती !

चीनच्या वाढत्या प्रभावाला शह देण्यासाठीचा भारताचा मुत्सद्दी प्रयत्न !

अमेरिकी युद्धनौकांच्या दुरुस्तीसाठी भारताने दुसरे शिपयार्ड ‘द कोचिन शिपयार्ड लिमिटेड’ उघडले !

वॉशिंग्टन / नवी देहली : चीनच्या वाढत्या प्रभावाला एकप्रकारे शह देण्यासाठी एकीकडे भारतीय नौदल अरबी समुद्रात समुद्र दरोडेखोरांवर आळा घालण्याच्या मोहिमा यशस्वी करून विविध देशांच्या नौका वाचवीत आहे, तर दुसरीकडे आता भारताने अमेरिकी युद्धनौकांच्या दुरुस्तीसाठी त्याचे दुसरे शिपयार्ड ‘द कोचिन शिपयार्ड लिमिटेड’ उघडले आहे. यामुळे आता अमेरिकी युद्धनौकांची दुरुस्ती आणि देखभाल सहज होऊ शकणार आहे. ही सुविधा मिळाल्यामुळे अमेरिकी युद्धनौका आता भारतीय पॅसिफिक प्रदेशात, म्हणजेच अशा ठिकाणी जेथे चिनी नौदल सतत तैवान, जपान आणि फिलिपाइन्स यांना धमकावत असतात, तेथे सहज गस्त घालू शकतील.

याआधी गेल्या वर्षी चेन्नईतील युद्धनौकांच्या दुरुस्तीसाठी अमेरिकी नौदलाने ‘लार्सन अँड टुब्रो’ आस्थापनाशी करार केला होता. तेव्हापासून भारतीय शिपयार्ड्सनी अमेरिकी नौदलाच्या युद्धनौकांची दुरुस्ती चालू केली. या ताज्या करारानंतर आता भारताच्या पूर्व आणि पश्‍चिम दोन्ही किनारपट्ट्यांवर अमेरिकी युद्धनौकांची सहज दुरुस्ती करता येणार आहे. मुळात हा करार एप्रिल २०१५ मध्येच करण्यात आला होता. अमेरिकेने या शिपयार्डची चौकशी करून सर्वेक्षण केले आणि त्यानंतर आता या कराराला मान्यता दिली आहे.

भारताच्या अंदमान आणि निकोबार बेटांचे सामरिक महत्त्व !

अंदमान आणि निकोबार बेटांपासून अगदी जवळ असलेली मलाक्का सामुद्रधुनी पॅसिफिक आणि भारतीय महासागर यांना जोडते. यामुळे अंदमान आणि निकोबार बेटांना सामरिक महत्त्व आहे. या बेटांचा ‘एव्हिएशन हब’ (विमानचालन केंद्र) म्हणून विकास केला जाऊ शकतो. मलाक्का सामुद्रधुनीतूनच दक्षिण चीन समुद्रात प्रवेश करता येतो. येथेही भारत अमेरिकेला काही सुविधा देऊ शकतो, जेणेकरून आगामी काळात चीनच्या आव्हानाला सक्षमपणे सामोरे जाता येईल. अंदमान निकोबार बेटांना भारताचे ‘न बुडणारे विमानवाहू जहाज’ म्हणतात. हे भारताच्या तिन्ही सैन्याच्या संयुक्त कमांडचे स्थानही आहे. अमेरिकेला या बेटांच्या सामरिक स्थानामुळे मोठा लाभ होऊ शकतो. याआधी ब्रिटीश युद्धनौकांनाही याचा लाभ झाला होता.