ठेवीदारांची १०० कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे प्रकरण
पुणे – गुंतवणुकीवर अधिक परताव्याचे आमीष दाखवून १०० कोटी रुपयांची फसवणूक करणार्या ‘व्ही.आय.पी.एस्. ग्रुप ऑफ कंपनी’ या आस्थापनाची २४ कोटी ४१ लाख रुपयांची मालमत्ता अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) जप्त केली आहे. आतापर्यंत ७० कोटी ८९ लाख रुपयांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. मुख्य आरोपी विनोद खुटे याने परदेशी मुद्रा विनिमय व्यवहार (फॉरेक्स) ट्रेडिंग कंपनी चालू केली. गुंतवणूकदारांना अधिक लाभाचे आमीष दाखवले. गुंतवणूकदारांनी जमा केलेली रक्कम ‘कान्हा कॅपिटल’ या आस्थापनामध्ये गुंतवली. त्याने अंदाजित १०० कोटी रुपये हवालामार्गे परदेशांमध्ये पाठवले. तो स्वत:ही दुबईमध्ये पळून गेल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. (गुन्हे करून परदेशामध्ये पळून जाणार्यांना भारत सरकारने अटक करून त्यांना कडक शिक्षा केली पाहिजे ! – संपादक)
या प्रकरणी ‘ईडी’चे संचालक रत्नेशकुमार कर्ण यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. आतापर्यंत ‘व्ही.आय.पी.एस्. ग्रुप ऑफ कंपनी’चे संचालक संतोष खुटे, मंगेश खुटे, किरण अनारसे, अजिंक्य बडघे यांच्या साथीदारांविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
संपादकीय भूमिका :गुन्हेगारांना कायद्याचे भय नसल्याचा परिणाम ! |