सध्या परीक्षांचा हंगाम चालू आहे. विद्यार्थ्यांनी प्रश्नपत्रिका सोडवणे, शिक्षकांनी त्या पडताळणे आणि त्यानंतर गुण देणे अशी साधारणतः परीक्षांच्या काळातील प्रक्रिया असते. सहस्रो विद्यार्थ्यांचे पेपर शिक्षकांकडे पडताळण्यासाठी येत असतात. ते सर्व अचूकपणे पडताळून देणे आणि गुणमोजणी करणे, हे शिक्षकांसाठी मोठे अग्नीदिव्य असते. त्याला सामोरे जातांना शिक्षकांना तारेवरची कसरत करावी लागते; कारण विद्यार्थी उत्तर म्हणून काय लिहितात, ते काही वेळा कळतच नाही. काही विद्यार्थ्यांचे अक्षर तर इतके खराब असते की, त्याने काय लिहिले आहे, ते डोळे किलकिले करून वाचले, तरी समजत नाही. शेवटी त्याने केलेली मांडणी किंवा एखाद दुसरा शब्द लक्षात घेऊन अंदाजे गुण द्यावे लागतात. काही व्रात्य विद्यार्थी अभ्यासच केलेला नसल्याने उत्तरपत्रिकेत शिक्षकांनी गुण द्यावेत, यासाठी काहीतरी सूचक विधान लिहून ठेवतात, तर काही जण उत्तरे लिहिणे दूरच, उलट त्यात चित्रे रेखाटून ठेवतात. सध्याच्या काळात तर विद्यार्थी उत्तरपत्रिकेमध्ये भलताच घोळ घालून ठेवत आहेत. एक प्रश्न पहिल्या पानावर, तर त्यातील दुसरा उपप्रश्न भलत्याच पानावर सोडवून ठेवतात. तिसर्या उपप्रश्नाचे उत्तर अगदी शेवटी लिहिलेले असते. असे लिहिलेला पेपर शिक्षकांनी पडताळावा तरी कसा ? सर्व उत्तरांची गोळाबेरीज करून गुण द्यावेत, तर तेही महाकठीण होते.
थोडक्यात काय, तर शिक्षकांची यात त्रेधातिरपिट होत आहे. त्यांना त्यात होणारा शारीरिक आणि मानसिक त्रास वेगळाच ! विद्यार्थी अशा पद्धतीने लिखाण का करतात ? त्यांना त्यांच्या भवितव्याविषयी काहीच देणे-घेणे नाही का ? त्यांच्या उत्तरपत्रिकेतील लिखाणात सलगता का नसते ? ‘क्रमांकानुसार उत्तरे लिहायला हवीत, इतकेही सामान्यज्ञान आजच्या विद्यार्थ्यांना नाही’, असे म्हणू शकत नाही. आपण जितके सुवाच्च अक्षर काढू किंवा लिखाणात टापटीपपणा ठेवू, तितके आपल्याला चांगले गुण मिळणार आहेत, याकडे विद्यार्थ्यांचे लक्ष का नसते ? या सर्वच प्रश्नांचा विचार केल्यास ‘विद्यार्थ्यांना परीक्षेचे महत्त्व किंवा त्या अनुषंगाने गांभीर्यच वाटत नाही’, हे लक्षात येते. शिक्षकांचा विचार करणे तर दूरच, उलट त्यांना आपल्या लिखाणातून त्रास देण्याचाच प्रकार विद्यार्थ्यांकडून केला जातो. ‘सरळमार्गी राहून काहीतरी मिळवायचे असते’, हे आजच्या पिढीला ठाऊकच नाही. त्यामुळे उलटा किंवा तिरपा मार्गच त्यांच्याकडून प्रत्येक वेळी अवलंबला जातो. आपण काय करत आहोत ? याचेही त्यांना कित्येकदा आकलन होत नसावे ! आजचे विद्यार्थी, म्हणजे देशाची भावी पिढी आहे. असे असतांना त्यांच्याकडून होणारे हे सर्व प्रकार, म्हणजे देशासाठी चिंताजनकच आहेत. विद्यार्थ्यांना लहान वयातच लेखनातील शिस्तीचे धडे दिले पाहिजेत. उत्तरपत्रिका नीट न सोडवणार्यांना शिक्षा करणे किंवा गुण न देणे हाच त्यावरील उपाय आहे !
– सौ. नम्रता दिवेकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.