पुणे येथे संतप्त झालेल्या नागरिकांनी पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय फोडले !

  • पाण्यासाठी इमारतींमधील नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटना

  • भीषण पाणीटंचाईचे संकट !

पिण्याच्या पाण्यासाठी लष्कर पाणीपुरवठा विभागाचे कार्यालय फोडले तर बावधनमध्ये टँकरच्या पाण्यासाठी हाणामारी!

पुणे – शहरातील उपनगर रामटेकडी भागात पाण्याची मागणी करूनही प्रशासनाकडून टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जात नाही. महापालिका प्रशासन अपयशी ठरत आहे, असा आरोप करत संतप्त झालेल्या नागरिकांनी लष्कर पाणीपुरवठा विभागाच्या कार्यकारी अभियंत्याचे कार्यालय फोडले. तसेच बावधनमध्ये इमारतीतील नागरिकांच्या टँकरच्या पाण्यासाठी हाणामारीच्या घटना घडत आहेत. ४ एप्रिल या दिवशी शहरातील बहुतांश भागातील पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला होता. त्यानंतर अल्प दाबाने पाणीपुरवठा झाल्याने बावधन, सूस, बालेवाडी, लोहगाव भागातील सोसायट्यांना टँकरने पाणीपुरवठा करण्यात आला. त्या वेळी पाणी मिळवण्यासाठी नागरिकांमध्ये हाणामारीच्या घटना घडल्या असून त्याची तक्रार मात्र करण्यात आली नाही.

महापालिकेमध्ये २ टप्प्यांमध्ये ३४ गावांचा समावेश करण्यात आला आहे. या गावांना आजपर्यंत प्रतिदिन १ सहस्र १७५ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. पहिल्या टप्प्यातील ११ गावांसाठी ५२७ टँकर, तर नव्याने समाविष्ट झालेल्या २३ गावांमध्ये महापालिकेकडून ७४८ टँकरद्वारे पाणीपुरवठा केला जातो. तरीही अजून टँकरची मागणी वाढत आहे. वाढत्या उन्हामुळे धरणातील पाणीसाठा अल्प होत आहे.

१५ जुलैपर्यंतचा पाणीसाठा शिल्लक !

शहरात पाण्याचे संकट जाणवू लागले आहे. नागरिकांची पाण्याची मागणी वाढू लागली आहे; मात्र काही ठिकाणी तांत्रिक बिघाड होत असल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. शहराला पाणीपुरवठा करणार्‍या धरणांमध्ये १५ जुलैपर्यंत पुरेल इतका पाणीसाठा शिल्लक असल्याने नागरिकांनी काळजी करू नये, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने केले आहे.