पाली, रत्नागिरी येथे श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी गायींची अवैध वाहतूक रोखली

रत्नागिरी – ३१ मार्चच्या मध्यरात्री अंजणारी येथून पालीकडे जाणारी बोलेरो पिकअप गाडी क्र. एम्.एच्. ३७ टी ३१०५ ही गायींना दाटीवाटीने बांधून भरधाव वेगाने पालीच्या दिशेने जात आहे, अशी माहिती मिळताच तात्काळ श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या धारकर्‍यांनी ती गाडी पाली येथे पकडली आणि नंतर वाहनचालकासहीत गाडीला पोलिसांच्या स्वाधीन केले. या गाडीमध्ये दाटीवाटीने ३ गाई भरल्या होत्या.

अधिक चौकशी करण्यात आली असता या गाडीचालकाकडे गुरे वाहतूक परवाना, वैद्यकीय प्रमाणपत्र किंवा वाहतूक कशासाठी केली जात आहे ? याची विचारणा केली असता त्याला त्याची उत्तरे देता आली नाहीत. त्यामुळे या गायी कत्तलीसाठी नेत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

गाडीमध्ये दाटीवाटीने भरलेल्या ३ गाई

या प्रकरणाचे पुढील अन्वेषण पोलीस करत आहेत. या गायींची प्रकृती चारा आणि पाणी अभावी खालावलेली होती. या गायींच्या प्रकृतीविषयी वैद्यकीय अहवाल मागवण्यात आला आहे. रात्री उशिरा तक्रार प्रविष्ट (दाखल) करण्याची प्रक्रिया चालू होती. या कारवाईच्या वेळी श्री शिवप्रतीष्ठान हिंदुस्थानचे पाली आणि लांजा येथील धारकरी उपस्थित होते.

संपादकीय भूमिका

जी माहिती एका संघटनेला मिळते, ती माहिती सर्व यंत्रणा हाताशी असलेल्या पोलिसांना का मिळत नाही ? खरे तर अशा प्रकरणांत पोलिसांनी स्वतःहून कारवाई करणे अपेक्षित आहे !