छत्रपती संभाजीनगर येथे मराठा समाजाच्या बैठकीत तुंबळ हाणामारी !

मराठा समाजाच्या बैठकीत हाणामारी

छत्रपती संभाजीनगर – सकल मराठा समाजाने येथे बोलावलेल्या बैठकीत मोठी हाणामारी झाली आहे. ही बैठक मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार बोलावण्यात आली होती; पण त्यात वाद निर्माण झाला.

मनोज जरांगे पाटील यांनी लोकसभा निवडणुकीचा उमेदवार ठरवण्यासाठी गावोगावी बैठक बोलावण्याचे आवाहन केले आहे. त्यानुसार शहरातील मराठा मंदिर मंगल कार्यालयात मराठा समाजाची २९ मार्च या दिवशी सकाळी ११ वाजता समन्वय बैठक बोलावण्यात आली होती. या बैठकीसाठी पंचक्रोशीतील मराठा नागरिक जमले होते. प्रारंभी शांततेत चालू असणार्‍या बैठकीत अचानक आरोप-प्रत्यारोप चालू झाले. काही जणांनी विशिष्ट उमेदवाराकडून पैसे घेऊन ही बैठक आयोजित केल्याचा आरोप केला. त्यानंतर बैठकीत वाद चालू झाला.

यासंबंधी प्रसारित झालेल्या एका व्हिडिओनुसार सर्वप्रथम मराठा कार्यकर्ते बाळू औताडे यांनी विकी पाटील नावाच्या तरुणाला मारहाण केली. त्यानंतर इतर जणही हाणामारीला पुढे सरसावले. यामुळे वातावरण अधिकच बिघडले. त्यानंतर दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. या वेळी काही महिलांमध्ये बाचाबाची झाली. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर वातावरण शांत झाले.