विष देऊन हत्या करण्याचा आल्याचा अन्सारीच्या कुटुंबियांच्या आरोपानंतर होणार चौकशी
बांदा (उत्तरप्रदेश) – येथील कारागृहात जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेला कुख्यात गुंड मुख्तार अन्सारी याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. कारागृहातच तो बेशुद्ध पडल्यानंतर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात भारती करण्यात आले. तेथे उपचार चालू असतांनाच त्याचा मृत्यू झाला. ‘अन्सारीला विष देऊन मारण्यात आले आहे’, असा आरोप त्याच्या कुटुंबियांनी केला आहे. अन्सारीचे शवविच्छेदन करण्यात आले असून त्याच्या अहवालातील माहिती उघड व्हायची आहे; मात्र या शवविच्छेदनावर विश्वास नसल्याचे सांगत त्याच्या नातेवाइकांनी ‘एम्स’ रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात यावे’, अशी मागणी केली आहे. कुटुंबियांच्या आरोपानंतर या प्रकरणाची न्यायदंडाधिकार्यांकडून चौकशी केली जाणार आहे.
अन्सारीच्या मृत्यूनंतर बांदा आणि गाजीपूर भागात मोठ्या प्रमाणात सुरक्षा वाढवण्यात आली असून कलम १४४ लागू करण्यात आले आहे. अन्सारीच्या मृतदेहावर मुरादाबाद येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
कोण होता मुख्तार अन्सारी ?
मुख्तार अन्सारी ५ वेळा आमदार म्हणून निवडून आला होता. अन्सारीवर ६५ हून अधिक गंभीर स्वरूपाचे गुन्हे नोंद होते. त्याच्यावर भाजपचे आमदार कृष्णनंद राय यांच्या हत्येचा आरोप होता. तो कारागृहातूनच टोळी चालवत होता. मुख्तार अन्सारी याचा एक भाऊ विद्यमान खासदार आहे. उत्तरप्रदेशमधील योगी आदित्यनाथ सरकारने मुख्तार अन्सारीवर कारवाई करत जवळपास ६०५ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली होती, तसेच त्याचे अनेक बेकायदेशीर व्यवसाय सरकारने बंद केले होते.