लोकसभा निवडणूक २०२४
अमरावती – येथील अपक्ष खासदार नवनीत राणा यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत नागपूर येथील भाजप कार्यालयात हा पक्षप्रवेश झाला. युवा स्वाभिमान पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आमदार रवि राणा यांना दिलेल्या त्यागपत्रात नवनीत राणा यांनी युवा स्वाभिमानच्या राष्ट्रीय महिला कार्याध्यक्ष पदाचे, तसेच प्राथमिक सदस्य पदाचे त्यागपत्र दिले आहे.
LIVE |📍नागपूर | जाहीर पक्षप्रवेश कार्यक्रम (27-03-2024) https://t.co/ZGNnVScjdR
— भाजपा महाराष्ट्र (@BJP4Maharashtra) March 27, 2024
नवनीत राणा म्हणाल्या की, मी भाजपच्या विचारापासून कधीही लांब नव्हते. माझे अमरावतीकर मला नक्की प्रेमाचा आशीर्वाद देतील. मी आकड्यांवर काम करत नाही. मी माझ्या जनतेसाठी काम करते. आकडा माझी जनता ठरवेल. उमेदवारी दिल्याविषयी मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे आभार मानते.
सर्वोच्च न्यायालयात जात प्रमाणपत्राविषयी निकाल प्रलंबित असल्याचे पत्रकारांनी विचारल्यावर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी ‘याविषयी निकाल लागला नाही’, असे म्हणत उत्तर देणे टाळले. १ एप्रिल या दिवशी सर्वोच्च न्यायालयात नवनीत राणा यांच्या जातप्रमाणपत्राचा निकाल अपेक्षित असल्याची माहिती आहे. ‘अमरावती येथून ४ एप्रिल या दिवशी नवनीत राणा यांचे आवेदन प्रविष्ट करणार आहे. नितीन गडकरी यांच्यानंतर नवनीत राणा यांना सर्वाधिक मते मिळतील’, असा दावाही बावनकुळे यांनी केला.