डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील अंतिम युक्तीवाद
पुणे – अंनिसच्या डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणातील मुख्य साक्षीदारांपैकी एक असलेल्या विनय केळकर यांनी ‘दुसर्या मजल्यावरून, तसेच ५०० मीटर अंतरावरून गोळी झाडणार्या दोघांना ओळखले’, असे सांगितले. ‘या दोघांनी टोपी घातली होती’, असेही साक्ष देतांना सांगितले. प्रत्यक्षात २०० मीटरवरून कुणाचाही चेहरा ओळखणे अशक्य असते, तर ५०० मीटर अंतरावरून चेहरा दिसणे कसे शक्य आहे ? त्यामुळे हा साक्षीदार खोटी माहिती देत आहे, असा युक्तीवाद मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी केला. डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी विशेष न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या पुणे येथील न्यायालयात चालू असून या वेळी संशयितांचे मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेद्र इचलकरंजीकर आणि केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे या वेळी उपस्थित होते.
या प्रकरणी कागदपत्रे सादर करण्यासाठी १ एप्रिल, तर सरकारी अधिवक्त्यांना युक्तीवाद करण्यासाठी ८ एप्रिल दिनांक देण्यात आला आहे.
अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांच्या युक्तीवादातील काही सूत्रे
१. सीबीआयने ५ ही संशयित आरोपींचे अधिकोष खाते आणि अधिकोषातील ‘लॉकर’ पडताळलेले नाहीत. त्यामुळे हे सर्व जण एकमेकांशी संबंधित होते, तसेच ‘त्यांचे आर्थिक संबंध होते’, असे कुठेही सिद्ध होत नाही.
२. ‘सीबीआय’चे मुख्य अन्वेषण अधिकारी एस्.आर्. सिंग यांनी प्रारंभी अधिवक्ता पुनाळेकर यांचा भ्रमणसंगणक (लॅपटॉप) जप्त केल्यानंतर ‘तो कुठे ठेवला हे माहिती नाही’, असे सांगितले. पुढे परत सिंग यांनी ‘काही माहिती घ्यावयाची असल्याने मी पोलिसांच्या ताब्यात असलेला ‘लॅपटॉप’ बाहेर काढला होता’, असे सांगितले. ‘त्यातील कोणत्या फोल्डरमधून मी माहिती घेतली ? हे सांगता येणार नाही’, असे त्यांनी न्यायालयात सांगितले.
३. ‘मृत्यू होण्यापूर्वी डॉ. दाभोलकर हे पुणे येथे कसे आले ?’, हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकलेला नाही, तसेच डॉ. दाभोलकर हे आदल्या दिवशी ज्या अमेय अपार्टमेंट रहात होते, तेथील सदनिकेतून सनातन संस्थेच्या संदर्भात काहीही संशयास्पद सापडलेले नाही.
डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि हत्येची नेमकी वेळ कोणती ? हे एक मोठे गूढ !
‘या प्रकरणात डॉ. दाभोलकर यांची हत्या कधी झाली ? हे एक मोठे गूढ आहे. प्रथमदर्शी अहवालात मृत्यूची वेळ वेगळीच आहे, तसेच डॉ. दाभोलकर यांच्या हत्येची नेमकी वेळ दर्शवणारा एकही वैद्यकीय अहवाल सरकारी पक्षाने सादर केलेला नाही. काही साक्षीदार ‘डॉ. दाभोलकर यांना घायाळ अवस्थेत पाहिले’, असे सांगतात, तर काही पोलीस ‘त्यांना मृत अवस्थेत पाहिले’, असे, तर काही साक्षीदार ‘त्यांना गोळी लागली होती’, असे म्हणतात ! डॉ. दाभोलकर हे आदल्या रात्री कुठे होते ? आणि ते हत्येच्या ठिकाणी कसे आले ? हेही सरकारी पक्षाने सिद्ध केलेले नाही. त्यामुळे डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या आणि हत्येची नेमकी वेळ कोणती ? हे एक मोठे गूढ आहे’, असे अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी यांचा अजब प्रश्न
डॉ. दाभोलकर यांनी स्वर्गातून येऊन मासिकावरील चित्र काढले का ?
अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड युक्तीवाद करत असतांना म्हणाल्या, ‘‘अंनिसच्या एका मासिकाच्या मुखपृष्ठावर हिंदु धर्मातील एका त्रिशूळधारी महिलेचे अंगावर कोणतेही वस्त्र नसणारे चित्र रेखाटण्यात आले होते. तिच्या पार्श्वभागावर नंदी दाखवण्यात आला होता. अशा तर्हेच्या चित्राने कुणाच्याही धार्मिक भावना दुखावू शकतात.’’ अधिवक्त्या सुवर्णा वत्स-आव्हाड हे सांगत असतांना सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी म्हणाले, ‘‘हे चित्र वर्ष २०१८ च्या अंनिसच्या मासिकाच्या मुखपृष्ठावर आहे. डॉ. दाभोलकर यांची हत्या वर्ष २०१३ मध्ये झाली. मग डॉ. दाभोलकर यांनी स्वर्गातून येऊन चित्र काढले का ?’’ यावर अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी ‘डॉ. दाभोलकर हे धर्म, देव, स्वर्ग अशा कल्पना मानत नसत’, असे निदर्शनास आणून दिले.