रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील ६७ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. मनोज कुवेलकर (वय ५५ वर्षे) यांना आलेल्या अनुभूती

सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकरआजी

१. साधकाच्या छातीत दुखणे आणि त्याने सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर (आई) यांनी सांगितलेला नामजप केल्यावर त्याच्या छातीत दुखायचे थांबणे

१ अ. साधकाने सद्गुरु कुवेलकरआजींनी सांगितलेला ‘परम पूज्य, परम पूज्य’ असा नामजप केल्यावर त्याच्या छातीत दुखायचे थांबणे आणि सद्गुरु कुवेलकरआजींनी ‘ईश्वरापेक्षा गुरु श्रेष्ठ असतात’, असे सांगणे : ‘९.१२.२०२३ या दिवशी रात्री मी झोपलो असतांना माझ्या छातीत पुष्कळ दुखत होते. त्या वेळी मी छातीत ज्या ठिकाणी दुखते, तिथे हाताचा तळवा धरून ‘महाशून्य’ हा नामजप करत होतो; पण दुखणे थांबत नव्हते. एकदा सद्गुरु आईंनी (सद्गुरु (श्रीमती) प्रेमा कुवेलकर यांनी) मला सांगितले होते, ‘‘शरिराला फार त्रास होत असल्यास तू ‘परम पूज्य, परम पूज्य’ असा नामजप कर.’’ हे मला आठवले. मी त्याप्रमाणे १५ मिनिटे नामजप केल्यावर माझ्या छातीत दुखायचे थांबले. मी दुसर्‍या दिवशी याविषयी सद्गुरु आईंना सांगितल्यावर त्या मला म्हणाल्या, ‘‘ईश्वरापेक्षा गुरु श्रेष्ठ असतात !’’

श्री. मनोज कुवेलकर

१ आ.  मी सत्संगात एका संतांना याविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘तुझ्यात प.पू. गुरुदेवांबद्दल भाव आणि श्रद्धा असल्याने तुला अशा अनुभूती येतात अन् तुझ्या अडचणी सुटतात.’’

२. साधकात ईश्वराप्रती भाव आणि श्रद्धा असल्याने त्याने देवतेला प्रार्थना केल्यावर त्याला देवता दिसणे 

मागील २ – ३ मासांपासून मी एखाद्या देवतेला प्रार्थना करत असतांना मला जोडलेले हात दिसतात. नंतर काही वेळाने त्या देवता दिसतात. मी सद्गुरु कुवेलकरआजींना याविषयी सांगितले. तेव्हा त्यांनी सूक्ष्मातून प.पू. गुरुदेवांना विचारल्यावर प.पू. गुरुदेव त्यांना म्हणाले, ‘तो कोणत्या देवतेचा हात आहे’, हे मनोजला ठाऊक आहे.’ मी सद्गुरु डॉ. मुकुल गाडगीळ यांना याविषयी सांगितले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘ही दैवी अनूभूती आहे. तुझ्यात ईश्वराबद्दल भाव आणि श्रद्धा असल्याने तुला ही अनुभूती सातत्याने येते.’’

३. साधकाला स्वप्नात प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले दिसणे अन् त्यांनी  साधकाला ‘ग्रंथ सिद्ध करायचे आहेत’, असे सांगणे 

२.१.२०२४ या दिवशी मला स्वप्नात दिसले, ‘प.पू. भक्तराज महाराज त्यांचे शिष्य परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या मुंबई येथील निवासस्थानी आले आहेत. त्यांच्यासमोर बरेच ग्रंथ ठेवले होते. मी त्यांच्यासमोर हात जोडून उभा होतो. ते मला म्हणाले, ‘हे ग्रंथ पहातोस ना ! आपल्याला एवढे ग्रंथ करायचे आहेत.’ कधी कधी प.पू. गुरुदेव माझ्या स्वप्नात येतात. तेव्हा त्यांच्यासमोर ग्रंथांसाठीचे लिखाणाचे कागद असतात. तेव्हा प.पू. गुरुदेव मला कागद दाखवून म्हणतात, ‘आपल्याला यातून ग्रंथ सिद्ध करायचे आहेत.’

४. प्रतिदिन अंघोळ करण्यापूर्वी साधकाने जलदेवता आणि सप्तनद्या यांना प्रार्थना करणे अन् त्याला ‘गंगामाता आशीर्वादाचा हात वर करून उभी आहे’, असे दिसणे आणि शिवलिंग अन् भगवान शिव यांचे दर्शन होणे 

मी प्रतिदिन जलदेवता आणि सप्तनद्या यांना प्रार्थना करून अंघोळ करतो. मागील १ – २ मासांपासून मी अंघोळ करण्यापूर्वी प्रार्थना करत असतांना मला ‘गंगामाता आशीर्वादाचा हात वर करून उभी आहे’, असे दिसते. मला वेगवेगळ्या स्वरूपात शिवलिंगही दिसते आणि त्याच्या मागे महादेव हातात त्रिशूळ घेऊन उभा असलेला दिसतो. मला शिवलिंगावर कधी चंदन किंवा भस्म यांचे पट्टे सोनेरी किंवा नेहमीच्या पांढर्‍या रंगात दिसतात.

५. साधकाला कुणकेश्वर मंदिराच्या बाहेर शक्ती, तर गाभार्‍यात शांती जाणवणे आणि शिवलिंगाच्या ठिकाणी ध्यानस्थ महादेव दिसणे 

११ ते १५.१२.२०२३ या कालावधीत मी सिंधुदुर्ग जिल्ह््यातील कणकवली येथे श्री. अशोक जाधव यांच्या घरी गेलो होतो. त्या वेळी आम्ही कुणकेश्वर (महादेवाच्या) मंदिरात गेलो होतो. आम्ही श्री कुणकेश्वराला वहाण्यासाठी फुले आणि नारळ घेऊन गेलो होतो. तेव्हा मला बाहेरील वातावरणात पुष्कळ शक्ती जाणवत होती. मला मंदिराच्या गाभार्‍यात गेल्यावर एकदम शांत वाटले. मी डोळे बंद करून शिवलिंगावर फुले वहात असतांना मला महादेव ध्यानस्थ बसलेला दिसला. मी वाहिलेली फुले महादेवावर पडली. माझी पुष्कळ भावजागृती झाली.

६. प.पू. भालचंद्र महाराज यांच्या मठात गेल्यावर साधकाला आलेल्या अनुभूती

अ. आम्ही (मी आणि अशोक जाधव) कणकवली येथील प.पू. भालचंद्र महाराज यांच्या मठात गेलो होतो. मी प.पू. भालचंद्र महाराज यांच्या मूर्तीला नमस्कार केला. तेव्हा मला ती मूर्ती सजीव भासत होती. मला वाटले, ‘प.पू. महाराज तिथे प्रत्यक्ष बसले आहेत.’

आ. नंतर मला प.पू. महाराज यांच्या ठिकाणी श्री दत्तगुरु दिसले.

इ. मी मठात बसलो. तेव्हा मला शांत वाटून माझी निर्विचार आणि ध्यान लागेल अशी स्थिती झाली.

ई. प.पू. महाराज ज्या गाडीतून फिरत असत, त्या गाडीचे मी दर्शन घेतले. त्या वेळी त्या गाडीत ‘प्रत्यक्ष प.पू. महाराज बसले आहेत’, असे मला दिसले आणि माझे डोळे भरून आले.’

– श्री. मनोज कुवेलकर (आध्यत्मिक पातळी ६७ टक्के, वय ५५ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (९.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक