‘मागील अनेक वर्षांपासून सनातन संस्था साधकांना स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनासाठी प्रयत्न करण्यास सांगत आहे. सध्याच्या कलियुगात अनिष्ट शक्तींचा त्रास आणि स्वभावदोष अन् अहं यांमुळे साधकांची आध्यात्मिक उन्नती होण्यात अनेक अडथळे येत आहेत. साधक आनंदप्राप्तीसाठी साधना करत आहेत. जीवन आनंदी होण्यासाठी चित्तावरील जन्मोजन्मीचे संस्कार नष्ट व्हायला हवेत आणि त्यासाठी स्वभावदोष अन् अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया गांभीर्याने राबवायला हवी.
साधकांनी सेवा किंवा व्यवहारातील कोणतीही कृती करतांना अंतर्मुख राहून स्वतःच्या चुकांचे निरीक्षण आणि चिंतन (टीप) केल्यास स्वभावदोष अन् अहं यांच्या पैलूंची जाणीव होऊ लागते. सातत्याने प्रयत्न केल्यानंतर त्यांची तीव्रता न्यून होऊ लागते. नंतर या प्रक्रियेचा अंतर्मनावर संस्कार झाल्यावर चूक होण्यापूर्वीच जाणीव होऊन योग्य कृती होते आणि साधनेतून आनंद मिळू लागतो.’
(टीप : ‘कोणती चूक झाली ? त्यामागे कोणता स्वभावदोष होता ? चुकीचा परिणाम स्वतःवर किंवा समष्टीवर काय झाला ? चूक पुन्हा होऊ नये, यासाठी उपाययोजना आणि पापक्षालन होण्यासाठी कोणते प्रायश्चित्त घेणार ?’, याविषयी चिंतन करावे.)
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सनातनच्या साधकांचे साधनेसाठीच्या समर्पणाचे एक उदाहरण !
‘देश-विदेशांतून अनेक जण गोव्यात पर्यटनासाठी म्हणून येतात आणि समुद्रकिनारा पहाण्यासाठी जातात; पण सनातनच्या गोव्यातील आश्रमातील अनेक साधकांनी मात्र वर्षांनुवर्षे गोव्यातील समुद्रही बघितलेला नाही.’- सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत. |