उल्हासनगर येथील शासकीय रुग्णालयात धर्मांतराचा प्रयत्न !

  • हिंदुत्वनिष्ठांची कारवाईची मागणी !

  • रुग्णालय प्रशासनाकडून उडवाउडवीची उत्तरे !


उल्हासनगर (जिल्हा ठाणे)
– येथील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील अतीदक्षता विभागात घुसून २ ख्रिस्ती स्त्रिया आणि काही पुरुष रुग्णांना फळे अन् बिस्किटे वाटप करण्याच्या बहाण्याने, तसेच बरे करण्याच्या नावाखाली ख्रिस्ती प्रार्थना करायला लावत होते. ‘प्रभूची प्रार्थना केल्याने रुग्ण बरे होतील’, असे जोरजोराने ते अतीदक्षता विभागात ओरडतही होते. या घटनेचा रुग्णांना त्रास होत होता. काही रुग्णांनी त्यांना जाब विचारण्याचा प्रयत्न केल्यावर त्यांनी तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. याविषयी बजरंग दल आणि विश्व हिंदु परिषद या संघटनेच्या कार्यकर्त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षकांकडे तक्रार करून गुन्हा नोंद करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी संबंधितांवर कारवाई करण्याचे आश्वासन दिले आहे. (हिंदूंनो, धर्मांतराचा प्रयत्न करणार्‍या ख्रिस्त्यांवर कारवाई होईपर्यंत स्वस्थ बसू नका ! – संपादक)


१८ मार्च या दिवशी या प्रकार घडला. विशेष म्हणजे रुग्णांच्या नातेवाइकांनी रुग्णालय प्रशासनाजवळ याविषयी तक्रार करण्याचा प्रयत्न केल्यावर प्रशासनाने त्यांना उडवाउडवीची उत्तरे दिली. उल्हासनगरमध्ये यापूर्वी ५ सहस्रांहून अधिक हिंदूंचे धर्मांतर झाले आहे.

 अतीदक्षता विभागात कुठलेही पदार्थ आणि अधिक व्यक्ती यांना जाण्याची अनुमती नसतांना एवढे लोक आत कसे गेले ? रुग्णालय व्यवस्थापनाची या धर्मांतराला फूस आहे, हेच यावरून लक्षात येत असल्याने रुग्णालय व्यवस्थापनाचीही सखोल चौकशी करून त्यांच्यावर कारवाई व्हायला हवी !

संपादकीय भूमिका 

उल्हासनगरमधील धर्मांतराच्या वाढत्या घटना पहाता त्या रोखण्यासाठी सरकार धर्मांतरविरोधी कायदा केव्हा करणार आहे ?