कुडाळ – ‘फ्लाय ९१’ या विमान आस्थापनाच्या सिंधुदुर्ग ते हैदराबाद विमानसेवेला १८ मार्चला प्रारंभ झाला; मात्र १९ मार्चला ५० प्रवाशांना घेऊन हैदराबादला जाण्याच्या सिद्धतेत असलेल्या विमानाची फेरी रहित झाल्याचे अचानक घोषित करण्यात आल्याने या प्रवाशांना मनस्ताप भोगावा लागला. या वेळी प्रवाशांना एक घंट्याहून अधिक वेळ ताटकळत रहावे लागले. ‘विमानसेवेच्या प्रारंभीच ही परिस्थिती असेल, तर या आस्थापनाकडून भविष्यात चांगली सेवा मिळण्याची अपेक्षा कशी करणार ?’, असा प्रश्न संतप्त प्रवाशांनी उपस्थित केला. सिंधुदुर्ग (चिपी) विमानतळावरून दीड वर्षापूर्वी ‘अलायन्स एअर’ या आस्थापनाची सिंधुदुर्ग-मुंबई-सिंधुदुर्ग अशी प्रवासी वाहतूक सेवा चालू आहे मात्र या आस्थापनाचीही सेवा चांगली नसल्याने प्रवाशांमध्ये अप्रसन्नता आहे.