पंचायतीने कारवाई न केल्यास कायदा हातात घेण्याची ग्रामस्थांची चेतावणी !
मडगाव, १८ मार्च (वार्ता.) : रुमडामळ-दवर्ली येथे उभारण्यात येणार्या अनेक अवैध बांधकामावर कारवाई करावी, अशी मागणी करत येथील नागरिकांनी १७ मार्च या दिवशी सरपंचाना घेराव घातला. या ठिकाणी अवैध बांधकामे उभारली जात असून काही ठिकाणी कोमुनिदादची भूमी हडपण्याचा प्रकार घडला आहे, असे नागरिकांनी म्हटले आहे.
‘यापूर्वी झालेल्या २-३ ग्रामसभांमध्ये रुमडामळ पंचायत भागातील अवैध बांधकामांचा विषय आला होता; परंतु पंचायतीकडून याविषयी वेळकाढू धोरण अवलंबण्यात येत आहे’, असा आरोप करत नागरिकांनी सरपंच मुबिना फणीबंध यांना घेराव घातला. ‘अवैध बांधकामे थांबवण्याची नोटीस दिलेली असून यासंबंधी कोमुनिदाद आणि गृहनिर्माण मंडळाच्या अधिकार्यांना पत्र पाठवण्यात येईल’, असे पंचायत सदस्य सैमुल्ला फणीबंध यांनी सांगितले.
‘कोमुनिदादच्या जागेत होत असलेल्या अवैध बांधकामांविषयी पंचायतीला कळवूनही कारवाई केली जात नाही. पंचायतीकडून काम बंद करण्याची नोटीस दिल्याचे सांगण्यात येते; परंतु प्रत्यक्षात सदर जागेवर जाऊन पहाणी केली असता काम चालूच असल्याचे दिसून येते. पंचायतीकडून कारवाई न झाल्यास ग्रामस्थांना कायदा हाती घेण्याविना पर्याय रहाणार नाही’, अशी चेतावणी ग्रामस्थांनी दिली आहे.
संपादकीय भूमिकापंचायत कारवाई करत नाही, याचा अर्थ पंचायतीचा अवैध कामांना पाठींबा असल्याचे कुणी म्हटले, तर त्यात चूक ते काय ? |