India Against ISLAMOPHOBIA In UN : एकाच धर्मासाठी नाही, तर सर्व धर्मांसाठी बोलण्याची वेळ आली आहे !

संयुक्त राष्ट्रांत ‘इस्लामोफोबिया’च्या (इस्लामविषयीच्या द्वेषाच्या) संदर्भात पाकच्या ठरावावर भारताने सुनावले !

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रूचिरा कंबोज

न्यूयॉर्क (अमेरिका) – ‘इस्लामोफोबिया’चे सूत्र निःसंशयपणे महत्त्वाचे आहे; परंतु इतर धर्मांनाही भेदभाव आणि हिंसाचार यांचा सामना करावा लागतो, हे आपण मान्य केले पाहिजे. इतर धर्मांसमोरील तत्सम आव्हानांकडे दुर्लक्ष करून केवळ ‘इस्लामोफोबिया’चा सामना करण्यासाठी उपलब्ध साधनांचे वाटप केल्याने असमानतेची भावना कायम रहाते, अशा शब्दांत भारताने संयुक्त राष्ट्रांत पाकिस्तानने मांडलेल्या ‘इस्लामोफोबियाशी लढण्यासाठी उपाययोजना’ या ठरावावर बोलतांना पाकला सुनावले. ११५ देशांनी ठरावाच्या बाजूने मतदान केल्याने तो संमत झाला. त्याला कुणीही विरोध केला नाही; मात्र भारत, ब्राझिल, फ्रान्स, जर्मनी, इटली, युक्रेन, ब्रिटनसह ४४ देशांनी मतदानात भाग घेतला नाही.

गुरुद्वारा, मठ आणि मंदिरे यांसारख्या धार्मिक स्थळांवर होत आहेत वाढती आक्रमणे !  

संयुक्त राष्ट्रांतील भारताच्या प्रतिनिधी रूचिरा कंबोज म्हणाल्या की, १२० कोटी हून अधिक अनुयायी असलेला हिंदु धर्म, ५३ कोटींपेक्षा अधिक अनुयायी असलेला बौद्ध धर्म आणि जगभरात ३ कोटींपेक्षा अधिक अनुयायी असलेला शीख धर्म हे सर्व धर्मांधतेचे बळी आहेत, हे ओळखणे महत्त्वाचे आहे. केवळ एका धर्माऐवजी सर्व धर्मांसाठी बोलण्याची वेळ आली आहे. अब्राहमिक (एकेश्‍वरवादी) धर्मांचे अनुयायीही अनेक दशकांपासून धार्मिक भीतीने त्रस्त असल्याचे पुराव्यांवरून दिसून येते. यामुळे धार्मिक भीतीच्या समकालीन प्रकारांना, विशेषत: हिंदूविरोधी, बौद्धविरोधी आणि शीखविरोधी भावना निर्माण झाल्या आहेत. धार्मिक भीतीचे हे समकालीन प्रकार गुरुद्वारा, मठ आणि मंदिरे यांसारख्या धार्मिक स्थळांवरील वाढत्या आक्रमणांवरून स्पष्ट होतात.’

श्रीराममंदिर आणि सीएए कायदा यांचा उल्लेख केल्यावरूनही भारताने पाकला सुनावले !

पाकिस्तानचे संयुक्त राष्ट्रातील राजदूत मुनीर अक्रम यांनी अयोध्येतील श्रीराममंदिराच्या उद्घाटन सोहळ्याचा आणि नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या (सीएएच्या) अंमलबजावणीचाही उल्लेख केला. यावर आक्षेप घेत कंबोज म्हणाल्या की, माझ्या देशाशी संबंधित विषयांवर पाकच्या शिष्टमंडळाचा मर्यादित आणि चुकीचा दृष्टीकोन पहाणे खरोखरच दुर्दैवी आहे. शिष्टमंडळ आणि त्याद्वारे केलेल्या टिप्पण्यांबद्दल केवळ एकच गोष्ट सांगता येईल की, ती खोटी नोंद आहे. संपूर्ण जग प्रगती करत असतांना पाकिस्तान केवळ एकाच सूत्रावर अडकला आहे.

संपादकीय भूमिका

  • जगभरात ‘जिहादी आतंकवाद’ इस्लामचा अनुनय करणारेच करत आहेत, हे उघड आहे. त्यामुळे जगभरात इस्लाम आणि मुसलमान यांच्या विरोधात उद्रेक वाढत आहे. असे असतांना जगभरातील इस्लामी देश, त्यांच्या संघटना किंवा मुसलमान पुढे येऊन त्याचा विरोध का करत नाहीत ?