|
नवी देहली – लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक केंद्रीय निवडणूक आयोगाने १६ मार्चला घेतलेल्या पत्रकार परिषदेत घोषित केले. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी माहिती देतांना सांगितले की, देशात येत्या १९ एप्रिल ते १ जून या काळात ७ टप्प्यांत मतदान होणार असून ४ जून या दिवशी मतमोजणी केली जाणार आहे. याच काळात सिक्किम, अरुणाचल प्रदेश, ओडिशा आणि आंध्रप्रदेश या राज्यांत विधानसभेचीही निवडणूक घेण्यात येणार आहेत. तसेच काही ठिकाणी पोटनिवडणुकाही होणार आहेत. हिंसाचार रोखण्यासाठीही आम्ही योग्य ती पावले उचलली आहेत. कुठल्याही प्रकारे हिंसा होऊ नये, यासाठी आम्ही सज्ज आहोत, असे राजीव कुमार यांनी या वेळी स्पष्ट केले.
निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर मतदारांना मिळणार सर्व माहिती !
प्रत्येक मतदाराला त्याचा मतदान केंद्र शोधणे आता सोपे होणार आहे. निवडणूक आयोगाच्या अधिकृत संकेतस्थळावर मतदारांसाठी योग्य ती सर्व माहिती पुरवण्यात आली आहे. त्याचप्रमाणे ‘नो युवर कँडीडेट’ (तुमच्या उमेदवाराला ओळखा) या अॅपवरून मतदाराला त्याच्या मतदारसंघातील उमेदवाराविषयी सगळी माहिती मिळणार आहे, अशी माहिती आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले.
#LokSabhaElections2024 to be held in 7 phases : Counting of votes on June 4 !
☑️ Voting from April 19 to June 1 !
☑️ Assembly elections of 4 states to also be held !#ElectionCommission #electiondate pic.twitter.com/ko4l4oLD8i
— Sanatan Prabhat (@SanatanPrabhat) March 16, 2024
प्रचारातील भाषेचा स्तर टिकवण्यासाठी प्रचारकांना नोटिसा बजावणार !
राजीव कुमार म्हणाले की, प्रचाराच्या वेळी आरोपांचा, भाषेचा घसरता स्तर पाहता याची गंभीर नोंद घेण्यात आली आहे. सर्व राजकीय पक्षांच्या मोठ्या प्रचारकांना नोटीस देण्यात येणार आहे. त्यामुळे प्रचारकांनी प्रचार करतांना योग्य ती काळजी घेण्याचा आदेश आयोगाने दिला आहे.
निवडणुकीच्या काळात पैसे वाटप चालू असल्यास १०० मिनिटांत पथक पोचणार !
राजीव कुमार म्हणाले की, आमच्यासमोर निवडणुकीची सिद्धता करतांना एकूण ४ आव्हाने होती. यामध्ये गुंडगिरी, पैसे आणि वस्तू यांचे वाटप, तसेच अफवा रोखण्याचे होते. त्यासाठी आम्ही जिल्हाधिकार्यांना योग्य पद्धतीच्या सूचना दिल्या आहेत. दारू आणि साड्या वाटपावर आमची करडी नजर रहाणार असून असा प्रकार करणार्यांवर कारवाई करण्यात येणार आहे. निवडणुकीच्या काळात मतदारांमध्ये कुठे पैसा वाटप चालू असेल, कुठे गैरप्रकार चालू असतील, तर नागरिकांनी त्याचे एक छायाचित्र काढून ‘सी विजील’ या अॅपवर अपलोड केल्यावर आम्ही तुमच्या भ्रमणभाषचे अक्षांश, रेखांश वरून स्थान ओळखून १०० मिनिटांत आमचे पथक तेथे पोचेल, अशी माहिती मुख्य निवडणूक आयुक्त यांनी दिली. (१०० मिनिटे पैसे वाटणारे आणि गैरप्रकार करणारे तेथे या पथकाची वाट पहात थांबणार आहेत का ? – संपादक)
१२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या वाढली !
देशातल्या १२ राज्यांमध्ये महिला मतदारांची संख्या पुरुष मतदारांच्या तुलनेत वाढली आहे. भारतात यावर्षी ९७ कोटी मतदार आहेत.
महाराष्ट्रात ५ टप्प्यात मतदान होणार
महाराष्ट्रात ५ टप्प्यांत मतदान होणार आहे. १९ एप्रिल, २६ एप्रिल, ७ मे, १३ मे आणि २० मे या दिवशी मतदान होणार आहे.
- पहिला टप्पा
विदर्भातील ५ जागांसाठी १९ एप्रिलला पहिल्या टप्प्यात निवडणूक होणार आहे.
यात रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या मतदारसंघामध्ये मतदान होईल. - दुसर्या टप्पा
यात बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड आणि परभणी मतदारसंघांमध्ये निवडणूक होईल. येथे २६ एप्रिलला मतदान होणार आहे. - तिसरा टप्पा
या टप्प्यात रायगड, बारामती, धाराशिव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या मतदारसंघांमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे. येथे ७ मेला मतदान होणार आहे. - चौथा टप्पा
या टप्प्यात १३ मेला नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहिल्यानगर, शिर्डी आणि बीड या मतदारसंघांमध्ये मतदान होणार - पाचवा टप्पा
या टप्प्यात २० मेला धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मुंबईतील सर्व ६ मतदारसंघांमध्ये मतदान होणार आहे.