येत्या २५ वर्षांत मराठीला राष्ट्रीय आणि वैश्विक भाषा म्हणून विकसित करण्यात येणार !
मुंबई – मराठी भाषेचे जतन, संवर्धन, प्रसार आणि विकास यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागाने १३ मार्च या दिवशी राज्याचे मराठी भाषा धोरण घोषित केले. यामध्ये येत्या २५ वर्षांत मराठीला राष्ट्रीय आणि वैश्विक भाषा म्हणून विकसित करण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले. १३ मार्च या दिवशी मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
शासनाने घोषित केलेल्या मराठी भाषा धोरणानुसार मराठी भाषेला ज्ञान आणि रोजगार यांची भाषा म्हणून प्रस्थापित करणे, विज्ञान-तंत्रज्ञान, वैद्यक आदी उच्च शिक्षण मराठी भाषेत उपलब्ध करण्यात येणार आहे. नवीन तंत्रज्ञानामध्ये मराठीचा उपयोग करणे, प्रशासकीय व्यवहारांमधील तंत्रज्ञानामध्ये मध्ये सर्वसामान्यांना समजेल असे तंत्रज्ञान मराठी भाषेत उपलब्ध करणे, राज्यातील बोली भाषांचे जतन आणि संवर्धन करणे आदी कार्यक्रम या धोरणाद्वारे राबवले जाणार आहेत.
मराठी भाषा धोरणातील महत्त्वाचे निर्णय !
१. मराठी भाषिकांची भाषिक क्षमता विकसित करण्यासाठी मराठी भाषा प्रयोगशाळा उभारण्यात येणार.
२. प्रशासनामध्ये सर्वसामान्यांना समजेल अशी मराठी भाषा विकसित केली जाणार आहे.
३. राज्यात ‘उत्तम इंग्रजीसह उत्तम मराठी’ हे धोरण राबवले जाणार. यामध्ये मराठी भाषा शिकण्यासाठी येणार्या मुलांना मराठी समजावी, यासाठी मराठी भाषेच्या पुस्तकाचे काठिण्य अल्प केले जाणार आहे.
४. राज्यातील सर्व माध्यमांच्या महाविद्यालयांतील ११ वी आणि १२ वी करता मराठी विषय अनिवार्य केला जाणार. त्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक सुधारणा केल्या जाणार.