चालू वर्षीच ‘अपना घर’मधील मुलांनी हिंसाचार केल्याची सुमारे ६ प्रकरणे स्थानिक पोलिसांकडे नोंद
(‘अपना घर’मध्ये गुन्हेगारी करतांना आढळलेल्या अल्पवयीन मुलांना ठेवले जाते)
पणजी, १३ मार्च (वार्ता.) : भरती करण्यात आलेल्या काही मुलांच्या पलायन करण्याच्या घटनांमुळे यापूर्वी राज्यशासन चालवत असलेले ‘अपना घर’ चर्चेत होते. सध्या ‘अपना घर’मधून मुलांनी पलायन करण्याच्या घटना घटलेल्या असल्या, तरी ‘अपना घर’ सध्या अंतर्गत त्रुटींमुळे पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. ‘अपना घर’मध्ये भरती करण्यात आलेल्या मुलांना अमली पदार्थ सहजतेने उपलब्ध होत असल्याचा आरोप आहे. ‘अपना घर’मधील कर्मचार्याने त्याच्या वरिष्ठांना या समस्येकडे गांभीर्याने लक्ष देण्याचे आवाहन केल्याचे वृत्त आहे.
‘अपना घर’मधील मुले बनत आहेत हिंसक !
गुन्ह्यांमध्ये सहभागी असलेल्या अल्पवयिनांना ‘अल्पवयीन न्याय मंडळा’च्या अधिकार क्षेत्राखाली ‘अपना घर’मध्ये ठेवले जाते. या मुलांची सुनावणी घेणार्यांना ‘अपना घर’मधील मुलांच्या हिंसेला वारंवार सामोरे जावे लागत आहे. चालू वर्षीच मुलांच्या हिंसाचाराची सुमारे ६ प्रकरणे स्थानिक पोलिसांकडे नोंदवली गेली आहेत आणि यामधील किमान ३ प्रकरणांमध्ये ‘अपना घर’मध्ये ठेवण्यात आलेल्या मुलांनी तेथील कर्मचार्यांवर आक्रमण केले आहे. मुलांनी आक्रमण केल्याने ‘अपना घर’मधील कर्मचार्यांना उपचारासाठी रुग्णालयात भरती करावे लागले आहे. हल्लीच एका महिला अधिवक्त्यांवरही ‘अपना घर’मध्ये भरती करण्यात आलेल्या एका मुलाने आक्रमण केले आहे. ‘अपना घर’मध्ये अमली पदार्थाची तस्करी होत असून ‘अपना घर’मधील काही मुले अमली पदार्थाचे सेवनही करत आहेत. ‘अपना घर’मधील अधिकार्यांना संबंधित मुलांना ‘इन्स्टिट्यूट ऑफ सायकिएट्री आणि ह्यूमन बीहेवियर’ या रुग्णालयात (मनोरुग्णालयात) भरती करण्याचा प्रस्ताव त्यांच्या वरिष्ठांनी दिला आहे; मात्र रुग्णालयात नेतांना मुलांना हाताळणार्या कर्मचार्यांच्या जिवाला धोका निर्माण होत असल्याने हा प्रस्ताव बारगळला आहे. मिळालेल्या माहितीनुसार संबंधित मुलांचे समुपदेशन करणे अत्यावश्यक आहे.
महिला आणि बाल कल्याण विभाग किंवा पोलीस खाते यांनी या प्रकरणांकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी ‘अपना घर’मधील कर्मचार्यांनी केली आहे, तसेच मुले अमली पदार्थाच्या सेवनामुळे हिंसक बनत आहेत का ? याचे अन्वेषण करण्याची मागणी होत आहे.