भारतीय स्त्रियांची ज्ञानपरंपरा (वैदिककाल ते अर्वाचीनकाल) !

८ मार्च या दिवशी असलेल्या जागतिक महिलादिनाच्या निमित्ताने !

‘भारतीय संस्कृती नित्यनूतन आणि पुरातन चिरंतन मानली जाते. शाश्वत आणि आवश्यक आहे, त्या नवीनतेला ती स्वीकारत आली आहे. जे युगानुकूल नाही, अशा जुन्याला सोडत सातत्याने पल्लवित होत आली आहे. परिणामतः मानवहिताचा विचार करणारे जागतिक विचारवंत भारताकडे आशेने मार्गदर्शक म्हणून बघत आहेत. भारतीय विकासात सभ्यता, संस्कृती, कुटुंबव्यवस्था, महिलांविषयीचा दृष्टीकोन, पर्यावरण, आर्थिक व्यवस्था इत्यादी विषयांना अभ्यासण्यासाठी भारताचे भ्रमण अभ्यासक करतांना दिसतात. त्यापैकी भारतीय चिंतनात महिलांचे स्वरूप हा लक्षणीय विचार केला गेला. अर्वाचीन कालखंडापर्यंत पोचण्यापूर्वी प्राचीन भारतातील वैदिक काळातील स्त्रियांचे ज्ञानक्षेत्रातील योगदान आपल्याला लक्षात घ्यावे लागते. आपली प्रज्ञा, अंतर्दृष्टी आणि आचरण यांच्या उत्कर्षाने महिलांनी वैदिक संस्कृतीला प्रदात्त रूप देण्यात सहकार्य केले.

संस्कृतीच्या निर्माणात वेदकालीन महिलांच्या योगदानाचा परिचय ऋग्वेदात प्राप्त होतो. ऋग्वेद १० मंडलात विभाजित असून दशम मंडल आधुनिक मानले जाते. त्यात ऋषिक स्त्रियांच्या सूक्तांचे संकलन आढळते. ऋग्वेदात २७ ऋषिकांची नावे आढळतात. जसे…

१. स्वसा म्हणजे अगस्त्य ऋषींची बहीण अगस्त्यवसा.

२. अपाला आत्रेयी म्हणजे अत्रि ऋषींची कन्या.

३. अदिती म्हणजे इंद्रदेवाची माता !

३ अ. अदिती – दाक्षायणी.

४. इंद्रमातर अर्थात देवभार्गो समूह !

५. इंद्राचा पुत्र वसुक्र म्हणजे पुत्रवधू – इंद्रस्नुषा वसकपत्नी.

६. इंद्रपत्नी इंद्राणी जी स्वतःला ‘अहमस्मि वारिणी पत्नी’ म्हणवते.

७. उर्वशी जी देवनर्तकी अप्सरा तिला आचार्य सायणाने ‘ऋविका’, तसेच देवता असे संबोधले आहे.

८. ब्रह्मवादिनी गोधा.

९. ऋषि कक्षीवानाची कन्या घोषा काक्षीवती.

१०. जुहू ब्रह्मजया.

११. दक्षिणा ऋषि प्रजापतीची कन्या दक्षिणा प्राजापत्य.

१२. नद्यः – अज्ञात नावाने नदीरूपात स्वतःच्या कल्पनेने या सूक्तात आत्मानुभव प्रस्तुत केला आहे.

१३. वैवस्वताची कन्या यमी वैवस्वती.

१४. रत्रि भारद्वाजी.

१५. बृहस्पतीची कन्या आणि राजा स्वनयो भावयव्याची पत्नी रोमशा.

१६. लोपामुद्रा.

१७. आंभभ्रण ऋषींची कन्या वाणीच्या महिमेला सूक्तातून रेखांकित करते, ती वागाम्भृणी.

१८. अत्रि ऋषींची कन्या विश्ववरा आत्रेयी.

१९. शची पुलोमाची कन्या शची पौलोमी.

२०. अंगीरस ऋषींची पत्नी शश्वती आंङ्गिरसी.

२१. ऋषि कश्यपांची पुत्री शिखंडिनी काश्यपी.

२२. सरमा देवशुनि.

२३. ऋषिका आणि देवता असलेली सार्पराज्ञी.

२४. सिकत निवावरी.

२५. सूर्या सावित्री.

२६. ऋषिका : ही कामगोत्रात उत्पन्न झाल्याने ‘श्रद्धा कामायनी’ या नावाने प्रख्यात झाली.

ऋग्वेदातील या महिलांमध्ये मुद्गल ऋषींची पत्नी ‘मुद्गलानी’, ‘वधिमती’ ‘विष्पुल’ ‘शुन्ध्युव’ इत्यादी उपरोक्त ऋषिकांचा गौरव करतांना तप, प्रतिभा, मेघा आणि अंतर्दृष्टी हे दिव्य गुण स्त्री अन् पुरुष दोहोंतही अस्तित्वात असल्याची मान्यता भारतीय ज्ञान परंपरेत आहे. यामुळे ‘आश्वलायन’मध्ये पंचयज्ञात आचार्यांसाठीच्या तर्पणसमयी गार्गी, लोपामुद्रा, सुलभा आणि मैत्रेयी यांचा आचार्य म्हणून गौरवोल्लेख केला जातो. सहस्रो वर्षांपासून चालत आलेल्या भारतीय परंपरेत स्त्रीचे स्थान महत्त्वाचे आहे, हे प्राचीन वैदिक काळात डोकावले असताही लक्षात येते. ढोबळमानाने हे ऋग्वेदातील महिला ऋषिकांचे नामसंकलन होय. ज्ञानाचा आदर आणि सन्मान हीच भारतीय संस्कृतीची विशेषता होय.’

– प्रा. जयश्री प्रकाश शास्त्री, नागपूर (साभार : त्रैमासिक ‘प्रज्ञालोक’, जानेवारी-मार्च २०२४)