हिंदुद्वेषी द्रमुक नेते ए. राजा यांचा जावईशोध !
(द्रमुक म्हणजे (द्रविड मन्नेत्र कळघम्- द्रविड प्रगती संघ)
कोईम्बतूर (तमिळनाडू) – भारत हा एक उपखंड आहे. याचे कारण काय ? तमिळनाडू हा देश आहे. मल्ल्याळम् एक भाषा आहे, एक राष्ट्र आहे आणि एक देश आहे. ओडिशा एक देश आहे, तिथे एक भाषा आहे. केरळमध्ये वेगळी आणि देहलीत वेगळी भाषा अन् संस्कृती आहे. हे सर्व देश मिळून भारत बनवतात. त्यामुळे भारत हा देश नसून एक उपखंड आहे, असे विधान तमिळनाडूतील द्रमुकचे खासदार ए. राजा यांनी केले. येथे तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम्.के. स्टॅलिन यांच्या वाढदिवसानिमित्त ३ मार्च या दिवशी आयोजित करण्यात आलेल्या सभेत राजा बोलत होते.
ए. राजा पुढे म्हणाले की,
१. मणीपूरमध्ये कुत्र्याचे मांस खाल्ले जाते. का ? कारण ही तेथील संस्कृती आहे. त्यात काहीही चुकीचे नाही. हे सर्व आपल्या मनात आहे. काश्मीरमध्ये वेगळी संस्कृती आहे. ते तुम्हाला स्वीकारावे लागेल. जर एखाद्या समुदायाने गोमांस खाल्ले, तर तुमची समस्या काय आहे ? त्याने तुम्हाला खाण्यास सांगितले काय ? विविधतेत एकता. हे मान्य करा आपल्यात मतभेद आहेत.
२. पाण्याच्या टाकीतील पाणी स्वयंपाकघरात तसेच शौचालयात येते. ते पाणी आपण स्वयंपाकघरात वापरतो; पण शौचालयातून आणलेले पाणी स्वयंपाकघरात वापरत नाही. याचे कारण काय ? ही एक मानसिक समस्या आहे. पाणी तेच आहे; पण ते कुठून येत आहे याने काय फरक पडतो ? आम्हाला ठाऊक आहे की, हे स्वयंपाकघर आहे आणि हे शौचालय आहे.
ए. राजा यांनी पूर्वी सनातन धर्माला एड्स आणि कुष्ठरोग म्हटले होते !
ए. राजा यांनी गेल्या वर्षी ६ सप्टेंबर या दिवशी चेन्नई येथे म्हटले होते की, कुष्ठरोग आणि एड्स यांच्याकडे आपण द्वेषाने पहातो. यालाही (सनातन धर्मालाही) असाच एक आजार म्हणून पाहिले पाहिजे. एड्स आणि कुष्ठरोग यांप्रमाणेच आपल्याला सनातन धर्माचेही उच्चाटन करायचे आहे.
संपादकीय भूमिकाभारत उपखंड आहेच; मात्र त्यात ‘भारत’ नावाचा वेगळा देश अस्तित्वात आहे, हे ए. राजा जाणीवपूर्वक नाकारण्याचा प्रयत्न करत आहेत. जर त्यांना भारत एक उपखंड आहे, असे म्हणायचे असेल, तर त्यांनी अखंड भारत निर्माण करण्यासाठी बोलावे आणि प्रयत्न करावेत ! |