विरोधी पक्षाला मतदान करणारे हिमाचल प्रदेश काँग्रेसमधील ६ आमदार अपात्र !

काँग्रेसचे राज्यसभेतील उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांचा झाला होता पराभव !

शिमला (हिमाचल प्रदेश) – हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे. असे असतांनाही राज्यसभेसाठी झालेल्या निवडणुकीत राज्याच्या एकमेव जागेवर काँग्रेसच्या उमेदवाराचा पराभव झाला. विधानसभेचे अध्यक्ष कुलदीप पठानिया यांनी या निवडणुकीत ‘क्रॉस व्होटिंग’ म्हणजे विरोधी पक्षाच्या उमेदवाराला मत देणार्‍या काँग्रेसच्या ६ आमदारांना अपात्र ठरवले. पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी ते दोषी आढळले आहेत. अध्यक्ष म्हणाले, ‘‘सरकारला जनादेश मिळाला. जनतेने ५ वर्षांसाठी सरकार निवडून दिले आणि हे लोक ‘आयाराम, गयाराम’चे राजकारण करत आहेत. या लोकांनीच पक्षांतरविरोधी कायद्याला निमंत्रण दिले.’’

सौजन्य The Indian Express

या ६ आमदारांनी पक्षाचे उमेदवार अभिषेक मनु सिंघवी यांच्याऐवजी भाजपचे हर्ष महाजन यांना मतदान केले. त्यामुळे सिंघवी यांचा राज्यसभा निवडणुकीत पराभव झाला. या ६ आमदारांना अपात्र ठरवण्यात आल्याने हिमाचल प्रदेशातील काँग्रेस सरकार पडण्याचा धोका टळला आहे. हिमाचलमध्ये एकूण ६८ आमदार असून या निर्णयानंतर काँग्रेसकडे आता ३४ आमदार उरले आहेत. भाजपचे २५ आमदार असून ३ अपक्ष आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार लोकसभा निवडणुकीपर्यंत मुख्यमंत्री सुखविंदर सुखू त्यांच्या पदावर रहाणार आहेत. ६ आमदारांचे सदस्यत्व संपुष्टात आल्यामुळे भाजप या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान देण्याची शक्यता आहे.