तक्रारवाडी (तालुका पुरंदर) येथे पहिली गोमाता चारा छावणी चालू !

खळद (जिल्हा पुणे) – पुरंदर तालुक्यात सध्या भीषण दुष्काळी परिस्थितीमुळे चारा-पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. या पार्श्वभूमीवर सेवानिवृत्त सनदी अधिकारी संभाजीराव झेंडे यांच्या पुढाकाराने ‘रहेजा फाउंडेशन, मुंबई आणि स्वर्गीय सदाशिव अण्णा झेंडे चॅरिटेबल ट्रस्ट’ यांच्या पुढाकाराने तक्रारवाडी येथे पुरंदर तालुक्यातील पहिली गोमाता छावणी चालू करण्यात आली. छावणीमध्ये पहिल्या दिवशी १०० जनावरांसह त्यांच्या चारा-पाण्याची, निवार्‍याची व्यवस्था करण्यात आली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य सुदामराव इंगळे यांनी ५०० किलो गोळीपेंड देण्याचे घोषित केले आहे.

पुरंदर तालुक्यात दुष्काळी उपाययोजना करणारे तहसीलदार, प्रांत, तसेच पोलीस उपविभागीय अधिकारी सध्या निलंबित आहेत. यामुळे जनतेने आवाज उठवणे आवश्यक आहे’, असे सुदामराव इंगळे यांनी सांगितले. संभाजीराव झेंडे यांनी आवाहन केले की, सामाजिक संस्था, राजकीय पक्ष यांनी हातात हात घालून काम केल्यास दुष्काळाची तीव्रता अल्प होईल.